बदलापूर । कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. वैशिष्ट्यपूर्ण अनुदान व नगर परिषदेच्या निधीतून ही इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या दोन वर्षांत हे काम पूर्ण होणार असल्याचे बोलले जात आहे. नगराध्यक्षा विजया राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या नगर परिषदेच्या पहिल्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बदलापूर पूर्व भागात रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या सर्व्हे नं. 39 या जागेत प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे. याप्रकरणी न्यायालयाचे कोणतेही स्थगिती आदेश नसल्याने व निधीही उपलब्ध असल्याने प्रशासकीय इमारत उभारणे शक्य असल्याचे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी स्पष्ट केले. ही प्रशासकीय इमारत बीओटी तत्त्वावर न उभारता नगर परिषदेच्या निधीतून बांधण्याची आग्रही मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी सभागृहात केली. यावर मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी नगर परिषदेकडे राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदानात प्रशासकीय इमारत आणि नाट्यगृहसाठीचा 14.14 कोटी रुपयांचा निधी असून नगर परिषदेकडेही 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असल्याने निधीची अडचण येणार नसल्याचे सांगितले तसेच आराखडा तयार करण्याची गरज व्यक्त केली तसेच महापालिकेच्या दृष्टीने विचार करावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले. त्यावर सर्वपक्षीयांनी आपापली मते व्यक्त करत प्रशासकीय इमारतीचा विषय तत्काळ मार्गी लावा, अशी मागणी केली.
निविदा मागवण्याची विनंती
माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी जुन्या निविदा रद्द करत नव्याने निविदा मागवण्याची विनंती केली, तर नव्याने आराखडा तयार करावा, अशीही मागणी त्यांनी सभागृहापुढे मांडली. शिवसेना गटनेते श्रीधर पाटील यांनी येथे अनेक वृक्ष असल्याने कमीत कमी वृक्षतोड करून इमारत बांधावी, अशी मागणी केली. ही जागा रेल्वेस्थानकाजवळ असल्याने येथे भविष्यात वाहतूककोंडीही होऊ शकते, त्यामुळे शक्य झाल्यास दुसर्या जागेचा विचार करावा, अशी सूचनाही त्यांनी केली. नगर परिषदेने बीओटी तत्त्वावर प्रशासकीय इमारत बांधण्याचा विचार सोडून स्वखर्चातूनच इमारत बांधावी, अशी आग्रही मागणी भाजप गटनेते राजेंद्र घोरपडे यांनी केली, तर वेळेचे योग्य नियोजन करून प्रशासकीय इमारतीच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष संभाजी शिंदे यांनी केली. दरम्यान, नगराध्यक्षा विजया राऊत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी शहरातील प्राधान्याने करण्यात येणार्या काही विकासकामांबाबत सांगितले होते. त्यामध्ये समावेश असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या कामाबाबत त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नगर परिषदेच्या पहिल्याच सभेत कार्यवाही झाली आहे. त्यामुळे शहरातील इतर विकासकामांबाबत व त्यांच्या पाठपुराव्या बाबतही नगराध्यक्षांची भूमिका अशीच राहावी, अशी बदलापूरकरांची अपेक्षा आहे.