पुणे । नरवीर तानाजी वाडी डेपोमधून हडपसर डेपोत बदली करावी, यासाठी संगनमताने दोन चालकांनी पीएमपी प्रशासनाकडे विनंती अर्ज केला होता. परंतु, वरिष्ठांनी कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांची भेट घेऊन बदली आणि दैनंदिन कामकाजात सतत होणार्या त्रासाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी गेलेल्या चालकाचे काहीही ऐकून न घेता त्यांना तत्काळ नोकरीवरून निलंबीत केल्याचा प्रकार समोर आला आहे.
विलास धुमाळ असे निलंबन करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. त्यांनी नतावाडी डेपोतून हडपसर डेपोत बदली करावी, यासाठी अर्ज केला होता. त्याबदल्यात राजू रंधवे यांनीही हडपसर डेपोतून नतावडी डेपोत आपआपसांत बदली व्हावी, यासाठी अर्ज केला होता.
काही न ऐकता केले निलंबीत
अनेकांना वरिष्ठांकडून दररोजच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शिवाय, चांगली बस मिळण्यासाठी प्रत्येक महिन्याला वरिष्ठांना काही रक्कम द्यावी लागते. दरम्यानच्या काळात प्रसंगावधान दाखवून अपघातग्रस्त वृद्धाला वाचविल्यानंतर त्याची बातमी वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाली होती, त्यानंतर अधिकार्यांचा रोष माझ्यावरील अधिकच वाढला होता. त्यामुळे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून अध्यक्षांकडून न्याय मिळेल, अशी आशा होती. याबाबतची माहिती त्यांच्या कानावर घालण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेलो. परंतु, त्यांनी एक शब्दही न ऐकता तू माझ्यापर्यंत आलाच कसा? असे म्हणत अरेरावी करून तत्काळ निलंबीत केले, अशी माहिती धुमाळ यांनी दिली.
धुमाळ यांनी अरेरावी केल्याचा आरोप
दरम्यान, धुमाळ यांना निलंबीत करण्यात आलेल्या पीएमपीच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, धुमाळ यांनी बदली अर्जाबाबत पुढे काय कार्यवाही झाली याबाबत कार्यालयीन सेवकांबरोबर अरेरावीची भाषा वापरली. वाहतूक व्यवस्थापकांच्या कार्यालयातील कर्मचार्यांशी उद्धट वर्तन केले. तसेच त्यांच्या कामकाजात अडथळा आणला आणि अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांच्या कार्यालयात येवून तेथील अधिकार्यांना देखील अरेरावीची भाषा वापरली. म्हणून त्यांचे निलंबन करण्यात आल्याचा उल्लेख आहे. मात्र धुमाळ यांनी हे सर्व आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे. तसेच मी अध्यक्षांच्या कार्यालयात कोणतीही अरेरावी केली नाही. हे सिद्ध करण्यासाठी त्यादिवशीचे सीसीटीव्हीचे फुटेज माहिती अधिकाराद्वारे मागविण्यात आले आहे, असे धुमाळ यांनी सांगितले.