बदलीसाठी राजकीय शिफारशी आणणारे पोलिस गोत्यात येणार!

0

पोलिस महानिरीक्षकांनी उगारला कारवाईचा बडगा

मुंबई : पोलिस खात्यात सध्या तणावाचे वातावरण आहे. त्याला कारण घडले आहे ते म्हणजे बदल्यांच्या प्रकरणावरून. ज्या पोलिस कर्मचार्‍यांनी आपल्या बदलीसाठी राजकीय शिफारसपत्रे आणली आहेत, त्या पोलिस कर्मचार्‍यांवर कारवाईचा बडगा पोलिस महानिरीक्षकांनी उगारला आहे. त्याची यादीच तयार करण्यात आली असून, यादीत सत्ताधारी पक्षाचे आमदार, मंत्री आणि पदाधिकार्‍याच्या पत्रांचा समावेश आहे. त्या सर्व कर्मचार्‍यांकडून आता लेखी खुलासा मागवण्यात आला आहे.

मंत्री, आमदार, राजकीय नेत्यांची पत्रे
बदलीसाठी राजकीय शिफारस आणणार्‍या 42 पोलिसांची पहिली यादी तयार करण्यात आली असून, त्यांच्यावर गृहविभागाकडून कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. पोलिसांना बदलीचे शिफारसपत्र देणार्‍यांमध्ये शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह अनेक आमदार आणि भाजपच्या राजकीय नेत्यांची नावे आहेत.

आबांच्या काळातही झाली होती कारवाई
दिवंगत गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. आर. पाटील उर्फ आबा यांच्या काळातही असा कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. छगन भुजबळांच्या काळात पोलिसांच्या बदल्यांमध्ये खूप अंदाधुंदी माजल्याचा आरोप केला जात होता. तेव्हा हे खाते आबांकडे सोपवण्यात आले होते. तेव्हा त्यांनी पारदर्शकता आणण्यासाठी ही कारवाई केली होती.

शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश
राज्यातील पोलिस निरीक्षकांनी अनेक आमदार, मंत्री तसेच इतर राजकीय नेत्यांचे शिफारसपत्र बदलीसाठी जोडले होते. या संदर्भातील लेखी खुलासा आता घेतला जाणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम, 1979 मधील तरतुदीनुसार शिस्तभंगविषय प्राधिकार्‍याने शिस्तभंगाची कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना विशेष पोलिस महानिरीक्षक राजकुमार व्हटकर यांनी पत्राद्वारे संबंधितांना दिल्या आहेत.