जळगाव । सेवा ज्येष्ठतेनुसार आंतरजिल्हा बदलीस पात्र शिक्षकांचे समुपदेशन करत बदली करण्यात आली. मात्र शिक्षण विभागातर्फे नियमाचे उल्लंघन करुन अन्यायकारकरित्या बदली करण्यात आली असून बदलीच्या ठिकाणी हजर होणार नसल्याची भुमिका शिक्षकांनी घेतली आहे. तसेच शिक्षण विभागाने केलेल्या पदस्थापनेस शिक्षकांनी विरोध दर्शविला असून बदली मान्य नसल्याने कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरात झालेल्या बदल्यास अनुसरुन बदल्या न करता मनमानी कारभाराने बदली केल्याचे आरोप शिक्षकांनी केले आहे. बुधवारी 26 रोजी जिल्हा परिषदेतील शाहु महाराज सभागृहात बदली पात्र शिक्षकांचे समुपदेशननानुसार समोरासमोर बदल्या करण्यात आल्या. जिल्ह्यात दुसर्या जिल्ह्यातुन येण्यास 259 शिक्षक बदली पात्र आहे. त्यापैकी समुपदेशनास 153 शिक्षक हजर होते. यात अवघड क्षेत्रात 58, पेसा क्षेत्रात 11, सर्वसाधारण सेवा क्षेत्रात 84 बदल्या करण्यात आल्या आहेत. समुपदेश प्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उज्ज्वला पाटील, शिक्षण सभापती पोपट भोळे, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, उपशिक्षणाधिकारी डी.डी.देवांग आदी उपस्थित होते.
सीईओ विरोधात रोष
राज्यभरातील जिल्हा परिषदेने शासन निर्णयानुसार बदली केली असून जळगाव जिल्ह्यात सीईओ कौस्तुभ दिवेगावकर यांनी नियमाचे उल्लंघन करुन पदस्थापना केली असल्याचे आरोप शिक्षकांनी केले. समुपदेशनानंतर सीईओंशी चर्चा करण्यासाठी शिक्षक त्यांच्या दालनात आले मात्र सीईओ समुपदेशनानंतर दालनात न येता जिल्हा परिषदेतुन निघुन गेले त्यामुळे शिक्षकांनी सीईओंबद्दल रोष व्यक्त केला.
अन् शिक्षकांना रडू कोसळले
राहत्या ठिकाणाहुन 50 ते 60 किलोमिटर दुर अवघड क्षेत्रात बदली करण्यात आल्याने तसेच दळणवळणाच्या सोयी नसल्याने शिक्षकांना त्या ठिकाणी सेवा देणे अवघड जाणार आहे. मनाविरुध्द बदली झाल्यामुळे शिक्षकांना अक्षरशः रडू कोसळले. पारिवारीक तसेच आरोग्य विषयक समस्या असल्याने बदली ठिकाणी सेवा देणे शक्य नसल्याचे शिक्षकांनी बदलीस विरोध दर्शविला आहे. जवळपास 50 शिक्षकांचा यात समावेश आहे. पती-पत्नी यांना 30 किलोमिटरच्या आतील शाळां देणे गरजेचे असतांना 50 ते 60 किलोमिटर दुर बदली करण्यात आली आहे. विधवा, अपंग, कुमारी शिक्षिकांचा देखील सीईओंनी विचार केला नसल्याचे शिक्षकांनी सांगितले.
बदली प्रक्रियेता पारदर्शकता नाही
सेवा ज्येष्ठतेनुसार बदली पात्र शिक्षकाकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरतांना प्राधान्यक्रमानुसार अर्ज भरुन घेतले. मात्र बदली करतांना प्राधान्य क्रमानुसार बदली करण्यात आलेली नसुन बदली प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचे आरोप शिक्षकांनी केले आहे. सीईओंनी केलेल्या बदलीमुळे 50 कुटुंबीयांवर अन्याय झाला असल्याची भावना यावेळी शिक्षकांनी व्यक्त केली.