डेहराडून । भूस्खलन झाल्यामुळे बंद झालेला बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग खुला करण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने, आपात्कालीन यंत्रणेच्या सहाय्याने 27 तास अथक प्रयत्न केले आहेत. महामार्ग खुला झाल्याने भूस्खलन झाल्यामुळे अडकलेल्या सुमारे 15 हजार भाविकांना दिलासा मिळाला आहे. भूस्खलन झालेल्या बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग खुला करण्याचे काम पूर्ण झाले आहे. बीआरओच्या पथकाने हा महामार्ग लहान-मोठ्या सर्व वाहनांसाठी खुला केला आहे. ही माहिती जोशीमठचे तहसीलदार चंद्रशेखर वसिष्ठ यांनी दिली आहे.
विष्णुप्रयाग येथील ‘हाथी पहाड’ जवळ दोन डोंगराच्यामधल्या भागात दरड कोसळल्याने रस्ता पूर्णत: बंद पडला होता. शुक्रवारी सायंकाळीपासून महामार्ग पूर्ववत करण्यासाठी वेगाने काम सुरू करण्यात आले होते. गढवालचे आयुक्त विनोद शर्मा यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. जिल्हा प्रशासनाने रस्त्यात अडकून पडलेल्या यात्रेकरूंची गैरसोय होवू नये, यासाठी ठिकठिकाणी मदत शिबिरे सुरू केली आहेत. आपत्कालीन यंत्रणेद्वारा यात्रेकरुंना नाष्टा, चहा, पाणी, भोजन तसेच प्राथमिक उपचाराच्या सुविधा दिल्या जात आहेत. 900 यात्रेकरूंनी याचा लाभ घेतला आहे. यात्रेकरूंना मदत शिबिरापर्यंत पोहोचविण्यासाठी एनटीपीस, टीएचडीसी, जेपी कंपनीची वाहने कार्यरत आहेत.