बधिर खेळाडूंचे विमानतळावरच धरणे आंदोलन

0

नवी दिल्ली । तुर्कस्तानमध्ये झालेल्या डेफ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले 46 बधिर खेळाडूंचे भारतीय पथक मंगळवारी मायदेशात परतले. एरवी इतर खेळाडूंच्या स्वागतासाठी हजर राहणारे मंत्री, सरकारी अधिकारी यांच्यापैकी कोणीच या खेळाडूंच्या स्वागतासाठी न आल्याने या खेळाडूंनी दिल्ली विमानतळावरच धरणे आंदोलन करत घरी जाण्यास नकार दिला होता. सरकार आणि क्रीडा मंत्रालयाकडून मिळालेल्या उपेक्षित वागणुकीमुळे नाराज झालेल्या या खेळाडू आणि त्यांच्या सहयोगी स्टाफने क्रीडा मंत्रालयाविरोधात घोषणाबाजीही केली. इंस्तबुलमध्ये झालेल्या डेफ ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी करताना एका सुवर्णपदकासह पाच पदकांची कमाई केली होती. बधिर ऑलिम्पिक 18 ते 30 जुलैदरम्यान आयोजित करण्यात आले होते. या बधिर ऑलिम्पिकमध्ये 97 देशांचे बधिर खेळाडू सहभागी झाले होते.

फोनही उचलला नाही
भारतीय पथकाचे व्यवस्थापक केतन शाह म्हणाले की, डेफ ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करणारे भारतीय पथक 1 ऑगस्टला सकाळी मायदेशी परतणार असल्याचा इ मेल 25 जुलै रोजी क्रीडामंंत्री विजय गोयल आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालकांना पाठवला होता. या ई-मेलला त्यांच्याकडून कुठलेच उत्तर मिळाले नाही. भारतीय खेळाडूंनी पदके जिंकलेली असताना सरकार किंवा क्रीडा मंत्रालयाचा एकही अधिकारी किंवा प्रतिनिधी खेळाडूंच्या स्वागतासाठी आला नाही.

पदक परत करण्याचा इशारा
खेळाडूंनी सापत्नभावाच्या वागणुकीसाठी सरकारला धारेवर धरले. देशात क्रिकेट सोडून इतर खेळांवर अजूनही फारसे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप या खेळाडूंनी केला. दुसर्‍या खेळांना प्रोत्साहन देणे दूरच राहिले. विजयी खेळाडूंचे स्वागतही व्यवस्थित केले जात नाही ही शरमेची बाब असल्याचे सांगून क्रीडा मंत्रालयाने अशीच मनमानी चालू ठेवली तर पदके परत करण्याचा इशारा या खेळाडूंनी दिला आहे.

कुस्तीमध्ये सुवर्णपदक
डेफ ऑलिम्पिकमध्ये भारताला एकमेव सुवर्णपदक कुस्तीमध्ये वीरेंद्र सिंगने मिळवुन दिले. वीरेंद्रसिंग हा भारताला दोन ऑलिम्पिक पदके जिंकून देणार्‍या सुशीलकुमारचा सहकारी आहे. सुशीलने अनेकदा वीरेंद्रसह कुस्तीचा सराव केला आहे. वीरेंद्रने 74 किलो वजनी गटातील फ्री स्टाइल प्रकाराच्या अंतिम फेरीत जॉर्जियाच्या चकवेताद्जेचा 18-9 असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले होते.