बधिर-मूक विद्यालयात पर्यावरण समिती स्थापन

0

स्वच्छता अभियानात विद्यालय सहभागी

चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगर पालिका प्रशासन व विशेषतः मनपा आरोग्य विभागाच्या सहकार्याने राबविण्यात येणार्‍या या उपक्रमामध्ये सर्वचजण सामील होत आहेत. इसिएच्या स्वच्छता चळवळीत चिंचवड बधिर-मूक विद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले आहे. या विद्यालयात पर्यावरण समिती स्थापन करण्यात आल्याचे इसिएचे विकास पाटील यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांसाठी नवा अनुभव
विकास पाटील पुढे म्हणाले की, साधारण विद्यार्थी असतील तर त्यांना बोललेले समजते. मात्र बधिर-मूक विद्यार्थ्यांना कसे सांगावे हेच कळत नव्हते. विद्यार्थी एकत्रित करून पर्यावरण विषयक कार्टून फिल्मच्या माध्यामातून पर्यावरण विषय व जंगलांची माहिती सांगताना इसिए सदस्यांची मोठी पंचाईत झाली. कारण त्या विशेष मुलांसोबत बोलणे अथवा त्यांच्याकडून येणार्‍या प्रतिक्रियांचा अर्थ सदस्यांना कळत नव्हता. या शाळेतील शिक्षकांच्या मदतीने कार्टून फिल्मवर भाष्य करून पर्यावरणाच्या संवर्धनाचे महत्व समजावून सांगितले. इसिएच्या स्वयंसेवक मंडळीने प्रथमच एक वेगळा सुखद व अप्रतिम अनुभव घेतला.

पर्यावरण समिती स्थापन
इसिएचे अध्यक्ष विकास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विद्यालयात विद्यार्थी पर्यावरण संवर्धन समितीची स्थापना करण्यात आली. त्यासाठी पर्यावरण पूरक वस्तू संच शाळेला इसिएतर्फे मोफत अपर्ण करण्यात आला. प्रत्येक विध्यार्थ्याने आपल्या घरी सुका कचरा व ओला कचरा वेगळा करण्या बाबत जर पालकाना प्रबोधन केले तर शहरातील कचरा समस्या चुटकी सरशी सुटणार, असे सर्व मुलांना पाटील यांनी सांगितले.

पुढील काही दिवसात इसिएच्यावतीने विद्यार्थ्यांच्यासाठी
‘स्वच्छ भारत’ या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रभाकर मेरुकर, दत्तात्रेय कुमठेकर, विश्‍वास जपे, गोविंद चितोडकर, अनिल दिवाकर, शाळा मुख्याध्यापक विकास पाटोळे आदी उपस्थित होते. सूत्र संचालन मिनाक्षी मेरुकर यांनी केले तर आभार अनघा दिवाकर यांनी मानले.