पिंपरी-चिंचवड : पिंपरीतील एचए मैदानानंतर आता व्यावसायिकांची वक्रदृष्टी भोसरी-मॅगझीन चौकादरम्यान असलेल्या बनाचा ओढा परिसराकडे वळली आहे. याठिकाणी आता राडारोडा व कचरा टाकण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या परिसरात राडारोडा विखुरल्याचे ओंगळवाणे दृश्य दिसत आहे. बनाचा ओढा या परिसराची वाटचाल आता डंपिंग ग्राऊंडच्या दिशेने होऊ लागली आहे.
रेडझोनचा परिसर
भोसरी-मॅगझीन चौकादरम्यान रेडझोनचा भाग आहे. यामुळे या परिसरात बांधकाम करण्यास मनाई आहे. त्यामुळे आजही हा परिसर रिकामा आहे. या रस्त्याच्या दुतर्फा महापालिकेचे उद्यानही आहे. यामुळे आजही हा परिसर पावसाळा व हिवाळ्यात हिरवाईची शाल नेसल्याचे आल्हाददायक दृश्य पाहायला मिळते. गेली अनेक वर्षांपासून हा परिसर मोकळा असल्याची संधी साधत इमारत पाडलेला राडारोडा व कचरा टाकण्यासाठी केला जात आहे. यामुळे रस्त्यालगत राडारोड्याचे ओंगळवाणे दृश्य दिसत आहे.
महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
शहरातील दुर्लक्षित असलेल्या मोकळ्या जागांचा वापर राडारोडा टाकण्यासाठी केला जात आहे. याध्ये एचए मैदान, सांगवीतील पवना नदीपात्र अशा अनेक जागांचा समावेश आहे. मात्र, यामुळे शहराच्या सौंदर्यात बाधा निर्माण होत असतानादेखील महापालिका प्रशासनाकडून योग्य ती कारवाई केली जात नसल्याने यात भरच पडत आहे. यापैकी एचए मैदान देखभालीची जबाबदारी एचए कंपनी प्रशासनाची आहे. मात्र, अन्य ठिकाणी महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे यावरून दिसून येत आहे.