वाराणसी : बनारस हिंदू विद्यापीठात (बीएचयू) एका विद्यार्थिनीची छेड काढल्यानंतर सुरू झालेल्या वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली. केंद्रीय मंत्री गडकरींनी याबाबतची माहिती दिली. लाठीमारात अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी जखमी झाले होते. या प्रकरणी बीएचयूच्या लंका भागातील एका ठाणे अंमलदाराला निलंबित करण्यात आले आहे. सर्कल ऑफिसर निवेश कटियार यांना पदावरून दूर करण्यात आले आहे. वाराणसीचे अतिरिक्त दंडाधिकारी सुशील कुमार गोंड यांनाही पदावरुन दूर करण्यात आले आहे. त्याचबरोबर 1200 विद्यार्थ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाल्याने विविध संघटना, पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राज बब्बर, पुनिया ताब्यात
विद्यार्थिनीची छेड काढल्यावरुन बनारस हिंदू विद्यापीठात विद्यार्थ्यांनी निषेध केला होता. हे आंदोलन सुरू असताना जोरदार दगडफेक करण्यात आली, तसेच वाहने जाळण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी अश्रुधुराचा मारा करत हवेत गोळीबार केला होता. या हिंसाचारात काही पोलिस कर्मचारीही जखमी झाले होते. रविवारी विद्यार्थ्यांनी शांतता मोर्चा काढला असताना पोलिसांनी त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बळाचा वापर केला. मागील तीन-चार दिवसांपासून हे प्रकरण धगधगत आहे. दरम्यान, पुन्हा एकदा आंदोलन सुरू झाले असून, काँग्रेसचे नेते राज बब्बर आणि पुनिया यांनी कँडल मार्च काढला असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
अशी झाली सुरूवात
गुरुवारी सायंकाळी बीएचयूच्या कला शाखेच्या एका विद्यार्थिनीची तीन युवकांनी छेड काढली. याची तक्रार करण्यास गेल्यानंतर विद्यापीठ व्यवस्थापनाने पंतप्रधानांचा दौरा असल्याचे कारण देत शांत राहण्यास सांगितले. कारवाई करण्याचे सोडून एका वरिष्ठ अधिकार्याने पीडितेलाच उशिरा बाहेर फिरण्याबद्दल खडसावले. त्यावर विद्यार्थिनी भडकल्या आणि त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले. शुक्रवारी एका विद्यार्थिनीने मुंडणही केले. आंदोलनामुळे पंतप्रधानांच्या ताफ्याचा मार्गही बदलावा लागला होता. गुरूवारपासून सुरू झालेले हे प्रकरण अजूनही तापलेले असून, त्याचे पडसाद देशभरात उमटले आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण
सध्या बनारस हिंदू विद्यापीठाला पोलिस छावणीचे रूप आले आहे. 1500 पोलिस तसेच पीएसी जवान तैनात करण्यात आले आहेत. बीएचयू तसेच जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये 2 ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना रविवारी वसतिगृह रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनेक विद्यार्थी भीतीपोटी घरी निघून गेले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाकडून या प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. लाठीमाराविरोधात अलिगड मुस्लीम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनीही मोर्चा काढला होता.