बनावट औषधींप्रकरणी आणणार नवी नियमावली

0

मुंबई । नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून काही औषध कंपन्यांकडून बनावट औषधांचा वापर करून ही औषधे बाजारात विकण्यात येतात. अशा बनावट औषधांची विक्री करणार्‍या कंपन्यांना कडक शासन करता यावे यासाठी राज्य सरकारकडून स्वतंत्र नियमावली तयार करून राज्यात लागू करण्यात येणार असल्याची घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत केली.

राज्यातील मुंबईसह ठाणे, भिवंडी, नाशिक आणि बुलढाणा येथे अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत बनावट औषधांचा साठा सापडल्याबाबतचा मुद्दा भाजपचे योगेश सागर यांनी प्रश्‍नोत्तराच्या तासादरम्यान विधानसभेत उपस्थित केला. त्यावरील चर्चेदरम्यान मंत्री बापट यांनी वरील घोषणा केली.

ठाणे आणि भिवंडी येथे अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. त्यावेळी राजश्री ट्रेडर्स या कंपनीकडे 10 लाख किमतीचे आणि कांचन फार्मा कंपनीकडे 6 लाख रुपये बनावट किमतीचा औषध साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी चौकशी करण्यात येत असून ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर संबंधित बनावट औषधांचा साठा करणाऱे आणि विक्री करणार्‍यांविरोधात न्यायालयात खटले दाखल करणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे राज्यमंत्री मदन येरावर यांनी दिली. येरावर यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने योगेश सागर यांनी पुन्हा प्रश्‍न उपस्थित करत किती दिवसात खटले दाखल करणार, असा प्रश्‍न उपस्थित केला. मंत्री गिरीश बापट यांनी हस्तक्षेप करत सदर बनावट औषधासंदर्भात केंद्र सरकारने कायदे केले असून, त्या नियमानुसार चार महिने, सहा महिन्यांचा कालावधी फक्त तपासणीसाठी आहे.

तसेच सहा महिने शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे त्या नियमात बदल करण्याचे काम दस्तुरखुद्द केंद्र सरकारकडे सुरू असून, त्यानुसार राज्य सरकारकडेही त्यात सुधारणा करण्यात येणार आहे. बनावट औषधांच्या साठ्याला आळा घालण्यासाठी कडक कारवाई करता यावी याकरिता नवीन नियमावली आणणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच अशा साठा करणार्‍यांविरोधात फक्त गुन्हे दाखल करण्याचे अधिकार विभागाला असून, शिक्षा करण्याचे अधिकार न्यायालयाला असल्याचेही त्यांनी सांगितले. बनावट औषधांमुळे रुग्णांच्या जीविताला निर्माण झालेला धोका पाहता सरकारने योग्य निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.