बनावट कागदपत्रांच्या आधारावर कोट्यवधींत फसवणूक

0

शहरातील तीन पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल ः शासकीय अधिकार्‍यांसह संशयितांची सक्रीय टोळी

जळगाव- जिल्ह्यात भूमिहीन लोकांना बनावट कागदपत्रे, बनावट सातबारा तयार करुन त्या आधारावर शासकीय जमीन मिळवून देण्याचे आमिष दाखविले तसेच खरेदी करुन कोट्यवधीत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी समोर आला आहे. यात तीन वर्षापासून सुरु असलेल्या या प्रकारात शासकीय अधिकारीही सहभागी असून शहरातील जिल्हापेठ पोलिसात दोन तर शहर पोलीस ठाण्यात एक असे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान याप्रकाराने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

दादावाडी येथील अभिमन्यू अर्जुन पाटील यांच्यासह इतरांची 2013 ते 2015 या काळात 5 कोटी 39 लाख 91 हजार रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात 11 संशयितांविरोधात शनिवारी गुन्हा दाखल झाला. तसेच धरणगाव शहरातील लक्ष्मीनगर येथील शिक्षिका नेहा कांतीलाल शर्मा यांचीही 2013 ते 2014 दरम्यान 23 लाख 64 हजार व इतरांची 2 कोटी 91 लाख 13000 याप्रमाणे एकूण 3 कोटी 14 लाख 77 हजार रुपयात फसवणूक केली तर शनिपेठेतील रहिवासी तथा रेमंड कंपनीतील लेबर कॉन्ट्रक्टर सुनील दत्तात्रय माळी यांची 8 लाख तर इतरांची 44 लाख 42 हजार अशी एकूण 52 लाख 42 हजारा फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अशाप्रकारे तीनही घटनात 9 कोटी 7 लाख10 हजारात सर्वांची रोख रक्कम स्विकारुन फसवणूक झाली आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारावर चक्क खरेदी
संशयितांनी संगनमत करुन खोटे व बनावट प्रमाणपत्र तयार करुन ते खरे असल्याचे भासविले तसेच भुमिहीन असलेल्यांना शासकीय नजराणा भरुन शासकीय जमीन देणार असल्याची खोटी बतावणी केली, त्याचबरोबर भुमिहिन लोकांचे सातबार्‍यांवर नाव लागल्याचे खोटे व बनावट सातबारा उताररा तयार केले तसेच खरेदीदाराकडून खरेदी करुन देतो, असे म्हणत दुय्यम निंबधक कार्यालयात बोलावून खरेदीची प्रक्रियाही पूर्ण केली.

सहा संशयितांना अटक
मुकूंद बलविरसिंह ठाकूर रा. बळीराम पेठ, सुरेंद्र बलविरसिंह ठाकूर रा. बळीराम पेठ, कंडारी तलाठी रविंद्र पंढरीनाथ बहादुरे रा. ऑडीटर कॉलनी, जळगाव, अ‍ॅड. प्रदीप निवृत्तीनाथ कुलकर्णी रा. आनंदकॉलनी, रुपेश भिकमचंद तिवारी रा इंद्रप्रस्थनगर,जळगाव, सतिष प्रल्हाद सपकाळे,रा.भारत डेअरी नवीपेठ, जळगाव, कैलास दशरथ बारी, राजेंद्र बुधोजी बारी, सुभाष दशरथ बारी, गणेश बारी, सुनील दशरथ बारी, पाचही रा. नवीपेठ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील गणेश विठ्ठल बारी, राजेंद्र बुधो बारी, कैलास दशरथ बारी, सुनील दशरथ बारी, सुभाष दशरथ बारी व रुपेश भिकमचंद तिवारी या सहा जणांना सायंकाळी अटक करण्यात आली. या सर्वांना जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.