जळगाव : शहरातील हरिविठ्ठल नगरात चोरट्याने दुचाकी लांबविल्याची घटना रविवारी सकाळी घडली. यात चोरट्याने बनावट चाबीने दुचाकी सुरू केली. त्यानंतर हॉर्न वाजविला. यानंतर मोपेड दुचाकी घेवून चोरटा पसार झाला. दुचाकीच्या हॉर्नचा आवाज आल्याने कुटुंबिय घराबाहेर आले असता, तोपर्यंत चोरटा भरधाव वेगाने दुचाकी घेवून रफूचक्कर झाला होता.
हरीविठ्ठल नगरात मारोती मंदिर परिसरात श्रीकांत हिरालाल कुमावत (35) हे कुटूंबासह वास्तव्यास आहेत. श्रीकांत हे आश्रम शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मालकीची मोपेड क्रमांक एम.एच.19 डी.एल.0918 ही मोपेड शनिवारी सायंकाळी त्यांनी घराच्या पोर्चमध्ये उभी केली होती. रविवारी सकाळी कुमावत कुटूंबिय घरात होते. यादरम्यान 06.30 वाजेच्या सुमारास कुमावत यांना त्यांच्या दुचाकीच्या हॉर्नचा आवाज आला. त्यामुळे दरवाजा उघडून खाली पोर्चमध्ये आले असता त्यांना मोपेड दिसली नाही. बनावट चाबीने चोरट्याने वाहन सुरू करून मोपेड घेऊन पसार झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी रामानंद नगर पोलिसांत श्रीकांत कुमावत यांनी तक्रार दिली आहे.