यावल- तालुक्यातील बोरोळे येथे डिसेंबर 2017 मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील प्रभाग क्रमांक तीनमधून नामाप्र प्रवर्गातील राखीव जागेवर निवडून आलेले संजीव रज्जूसिंग राजपूत यांची येथील न्यायालयाने निवड रद्द केली आहे. भडगाव तहसीलकडून प्राप्त झालेला राजपुत भामटा या जातीच्या दाखल्यावर ही निवडणूक राजपूत यांनी लढवली होती. उमेदवारी अर्जासोबतचा जातीचा दाखला बनावट असल्याचे सिध्द झाल्याने ही निवड रद्द करण्यात येत असल्याचा निकाल न्या.डी.जे.जगताप यांनी दिला आहे. या निर्णयाने तालुक्यात खळबळ उडाली आहे. डिसेंबर 2017 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राजपूत यांना 74 तर सुनील पंडीत यांना 71 मते मिळाली होती. प्रतिस्पर्धी सुनील ज्ञानेश्वर पंडीत यांनी निकालानंतर राजपूत यांच्याविरुद्ध यावल न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली होती. न्यायालयाने प्रमाणपत्राची पडताळणी केली असता राजपुू यांचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे सिद्ध झाल्याने राजपूत यांची निवड रद्द करण्यात आली. पंडित यांच्याकडून अॅड.राजेश गडे तर राजपूत यांच्याकडून अॅड.अजित वाघ यांनी काम पाहिले.