बनावट टीईटी निकालाची पडताळणी सुरू

पुणे ते शिंदगव्हाण, रजाळे कनेक्शन चर्चेत ?

 

 

 

नंदुरबार प्रतिनिधी – बनावट वेबसाईटवर नंदुरबार जिल्ह्यातही अपात्र उमेदवारांना निकाल देण्यात आला आहे काय ? याची चौकशी केली जात असून सन 2012 नंतर गुरुजी बनलेल्या शिक्षकांचे टीईटी प्रमाणपत्र पडताळणीसाठी मागवण्यात आले आहे. त्यामुळे भिंग फुटण्याच्या भीतीने एजंटांसह बोगस असलेल्या गुरुजींच्या मनात चांगलीच धडकी भरली आहे. या प्रकरणातील संशयाची सुई नंदुरबार शहरातील ज्ञानदीप सोसायटीतील एजंटांकडे तसेच

शिंदगव्हाण येथील बहुचर्चित जमिनीच्या गुंतवणुकीकडे लागली आहे .

राज्यभर गाजत असलेल्या टीईटी परीक्षा घोटाळ्याचे केंद्र ठरलेला नंदुरबार जिल्हा चांगलाच चर्चेत आला आहे. या प्रकरणाचे कनेक्शन पुणे ते नंदुरबार तालुक्यातील शिंदगव्हाण तसेच रजाळे असे प्रथमदर्शी जुळत असल्याने स्वतःचा आर्थिक फायदा साधण्यायाबरोबरच डी.एड .झालेल्या अनेक उमेदवारांचे भवितव्य अधांतरी ठेवणाऱ्या एजंटांची चांगलीच झोप उडाली आहे. परीक्षा मंडळाचे आयुक्त तुकाराम सुपे हे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या एजंटांची कुंडली देखील त्यांच्याजवळ असण्याची दाट शक्यता आहे. नंदुरबार तालुक्यातीलच या साखळीतील एक कर्मचारी पुणे येथे शासकीय नोकरीला असल्याने त्या माध्यमातून टीईटी पेपर फुटीचे हे प्रकरण त्यांच्या भोवती फिरू लागले आहेत. शहरातील ज्ञानदीप सोसायटीत राहणाऱ्या आणखीन दुसऱ्या एजंटांनी लक्ष्मी दर्शन दाखवण्यास सुरुवात केल्यामुळे संशयाची पाल चुकायला लागली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पुणे येथील पोलीस यंत्रणेने नंदुरबार जिल्ह्यात येऊन अशा एजंटांचा पर्दाफाश करावा अशी मागणी जिल्हाभरातून होऊ लागली आहे.