बनावट दारुअड्डा उद्ध्वस्त

0

भुसावळ। येथील तालुका पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या पुरूषोत्तम नगरातून सुमारे दीड लाख रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा शनिवार 17 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जप्त करण्यात आला असून या ठिकाणी बनावट दारु तयार केली जात असल्याचे सांगितले जात आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या पथकाने कारवाई करीत हा कारखानाच उध्वस्त केला असल्याचे शहरातील अवैध मद्य विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. तालुका पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या पुरूषोत्तम नगरातून सुरेश चंदाणी यांच्या घरात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या मद्यसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून या ठिकाणी शनिवारी दुपारी छापा टाकून कार्यवाही करण्यात आली.

 

 

मद्यसाठ्यामध्ये महागड्या किंमतीच्या ब्रँडचाही समावेश
यातील आरोपी चंदाणी पसार  झाला असून जप्त मद्यासह अन्य मुद्देमाल जप्त करण्याची कार्यवाही सुरू होती. या मद्यसाठ्यामध्ये महागड्या किंमतीच्या ब्रँडचाही समावेश आहे.

 

हॉटेल व ढाब्यांवर कारवाई
तसेच नशिराबाद हद्दीतील हॉटेल व ढाब्यावर धाड टाकत सुमारे 35 हजारांचे देशी-विदेशी मद्य जप्त करीत आरोपींना अटक केली़. पहिली कारवाई हॉटेल शालीमारवर करण्यात आली़. मुक्तार अब्दुल शेख बिलाल यास अटक करण्यात आली तर 23 हजार 632 किंमतीचे मद्य जप्त करण्यात आल़े. दुसरी कारवाई समर सिंग ढाब्यावर करण्यात आली़. संदीप मराठे यास अटक करण्यात आली़. आरोपीच्या ताब्यातून 11 हजार 150 रुपयांची देशी-विदेशी दारु जप्त करण्यात आली़.

 

मद्य विक्रेत्यांमध्ये आश्‍चर्य
नशिराबाद हद्दीत असलेल्या हॉटेल व ढाब्यांवर अवैधरित्या मद्यविक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरुन सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अचानकपणे धाड टाकण्यात आली. यामध्ये पोलीस कर्मचारी युवराज अहिरे, दिलीप कोळी, प्रदीप पाटील, अयाज, संकेत झांबरे, विशाल सपकाळे, नीलेश बाविस्कर, दीपक जाधव, गजानन देशमुख आदींच्या पथकाने ही कारवाई केली़. दरम्यान नशिराबाद हद्दीत करण्यात आलेल्या कारवाईमुळे मद्य विक्रेत्यांमध्ये आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.