बनावट दारुचे रॅकेट उद्ध्वस्त!

0

जळगाव/चाळीसगाव। चाळीसगाव शहराबाहेरच्या बायपास रोडवरील पाटणादेवी फाटा ते कन्नड फाट्या दरम्यान शेताच्या बांधावर देशी – विदेशी दारूचा साठा ठेऊन बनावट देशी दारू तयार करण्यार्‍या तिघांना जळगावच्या विशेष गुन्हे शाखेच्या पथकाने 16 एप्रिल रोजी छापा मारून अटक केली. त्यांच्याकडून 1 लाख 11 हजार 535 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. या कारवाईने अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून आरोपींविरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

1 लाखाचा देशी,विदेशी दारूचा साठा जप्त
कन्नड बायपासवरील एका शेतात विदेशी, देशी दारू व बनावट देशी दारू तयार करण्याचे साहित्य असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर यांना मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक राजेशसिंह चंदेल, सपोनि प्रकाश इंगळे, हवालदार अशोक चौधरी, मंगलसिंग पाटील, रवींद्र घुगे, पोलीस नाईक रामकृष्ण पाटील, रमेश चौधरी, रवींद्र गायकवाड, महेश पाटील, योगेश पाटील, मनोज दुसाने यांनी छापा मारला त्याठिकाणी 17 हजार 875 रुपयांच्या एम बी व्हिस्कीच्या 143 बाटल्या, 7 हजार 260 रुपयाच्या रॉयल स्टॅग 44 बाटल्या, 56 हजार 500 रुपयाच्या 22 कॅरेट व्हिस्की 113 बाटल्या , 1300 रुपयाच्या देशी प्रिन्स 26, तसेच बनावट देशी दारू तयार करण्यासाठी लागणारे पातेले, 50 प्लास्टिक पिशव्या 10 लिटरचे 20 कॅन, 500 बाटल्यांचे बूच, फ्लेवरची बाटली , बूच सील करण्याचे मशीन 500 विदेशी दारूच्या रिकाम्या बाटल्या असा 1 लाख 11 हजार 535 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

पोलिसच बनले फिर्यादी
देशी – विदेशी दारू व बनावट देशी दारू तयार करण्यासाठी स्पिरिट(ईसरा)चे पाण्यात मिश्रण करून त्यात संत्र्याचे इसेन्स बनावट देशी दारू तयार करतांना आरोपी फिरोज खान अहमद खान (30,रा- मुस्लिम पुरा, मालेगाव ह मु पाणी टाकीजवळ चाळीसगाव), नदीम खान शब्बीर खान (23), शाहरुख शेख रफिक (24, दोघे रा – चाळीसगाव) यांना अटक करण्यात आली .पोलीस नाईक रामकृष्ण पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सपानि प्रकाश इंगळे करीत आहेत