धुळे । तालुक्यातील वार-कुंडाणे गावात इंग्लिश बनावट दारु निर्मितीच्या कारखान्यावर तालुका पोलिसांनी छापा टाकून कारखाना उद्ध्वस्त केला असून याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. वार-कुंडाणे गावात इंग्लिश बनावट दारुनिर्मितीचा कारखाना सुरु असल्याची गुप्त माहिती तालुका पोलिसांना मिळाली होती. आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास तालुका पोलिसांच्या पथकाने छापा टाकला असता या ठिकाणाहून बनावट दारु निर्मितीसाठी लागणारे 200 लिटर स्पिरीट, मोटारसायकल, विविध प्रकारचे रसायन तसेच विविध प्रकारची इंग्लिश बनावट दारुच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या.
200 लीटर स्पिरीट, मोटरसायकल, रसायन आदी जप्त
याप्रकरणी तीन संशयितांसह एम.एच.18/3952 या क्रमांकाची मोटारसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली असून तालुका पोलिस ठाण्यात दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरुृं होते. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश सोनवणे, पोलिस निरीक्षक एस. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल कोळी, पोलिस उपनिरीक्षक नंदा पाटील यांच्यासह एएसआय कैलास दामोदर, नीलेश मोरे, राजेंद्र मोरे, पो.काँ. ओंकार गायकवाड, राकेश सूर्यवंशी, सचिन वाघ यांच्या पथकाने केली.