बनावट दारूचा साठा जप्त : मुक्ताईनगरात दोघांना अटक
राज्य उत्पादन शुल्क विभागाची मुक्ताईनगरात मोठी कारवाई : अनेक संशयीत विभागाच्या रडारवर
मुक्ताईनगर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक लाख दोन हजार 862 रुपये किंमतीचा अवैध बनावट दारूचा साठा तालुक्यात दोन कारवायांमधून जप्त करीत दोघांच्या मुसक्या बांधल्याने अवैधरीत्या मद्य तस्करी करणार्यांसह अवैध मद्य विक्री करणार्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. मोठ्या प्रमाणावर बनावट मद्य तस्करांची टोळी कार्यरत असल्याचा राज्य उत्पादन शुल्क विभागाला संशय असून त्या अनुषंगाने कारवाईची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पियुष गणेश हळदे (25, रा.मुक्ताईनगर) व अनंत गणेश वाढे (रा.चिखली, ता.मुक्ताईनगर) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
मुक्ताईनगर-बोदवड रस्त्यावर एका दुचाकीवरून विदेशी मद्याची मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाल्यानंतर शनिवारी पथकाने सापळा रचून संशयीत पियुष हळदे यास अटक केली तर दुसरी कारवाई हॉटेल साई गजानन ढाब्यावर करण्यात आली. एक लाख दोन हजार 862 रुपये किंमतीचा अवैध बनावट मद्य साठ्यासह दुचाकी जतत् करण्यात आली. पियुष हळदेसह अनंत वाढे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा संशयीतांना अटक करण्यात आली.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, दक्षता उषा वर्मा, विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, अधीक्षक सीमा झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ विभागीय निरीक्षक सुजित ओं. कपाटे, दुय्यम निरीक्षक राजेश निं.सोनार, विभागिय निरीक्षक पथकाचे जवान व वाहनचालक सागर देशमुख, सहा.दुय्यम निरीक्षक मधुकर वाघ, जवान विठ्ठल हाटकर यांच्या पथकाने केली.