बनावट नियुक्तीपत्रप्रकरणी एकाला 30 पर्यंत पोलिस कोठडी

0

जळगाव । जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने 46 जणांना बनावट नियुक्तीपत्रे दिल्याचे उघड झाल्यानंतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी दुसर्‍या संशयिताला शहर पोलिसांनी 23 मार्च रोजी अटक केली. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत सोमवारी संपली. त्याला प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 30 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिस कोठडीत वाढ
जि.प. च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात वर्ग 4 च्या 46 पदांची बनावट नियुक्तीपत्रे देऊन तीन वर्षापूर्वी प्रत्येकाकडून एक ते दीड लाख रुपये उकळण्यात आले आहे. या बनावट नियुक्तिपत्र प्रकरणात जि. प. चे कर्मचारी राजू भोजू भोई आणि सुभाष भिकन मिस्तरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी 6 मार्च रोजी जळगावातून राजू भोई याला अटक केली. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तर दुसरा संशयित सुभाष मिस्तरी याला 23 मार्च रोजी अटक केली. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत सोमवारी संपली. त्याला न्यायाधीश पाटील यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 30 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. सरकारतर्फे अ‍ॅड. आशा शर्मा यांनी कामकाज पाहिले.

तरूणांकडून वृध्दाला मारहाण
जळगाव- संभाजी महाराजांच्या बलीदान दिनाच्या निमित्ताने रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅली सोमवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास शिवतीर्थ चौकात एक पायी चालणार्‍या वृद्धाला जात असताना रॅलीतील तरूणांनी मारहाण केली. संभाजी महाराजांच्या बलीदान दिनाच्या निमित्ताने मशाल रॅली काढण्यात आली होती. रॅली शिवतीर्थाजवळ असताना शेख मेहमूद शेख हुसेन हे पायी रस्त्याने जात होते. त्यावेळी काही तरूणांनी त्यांना थांबण्यास सांगितले. मात्र जाण्यासाठी रस्ता असल्याचे सांगून ते पुढे चालत होते. त्यावेळी काही तरूणांनी त्यांना बेदम मारहाण केली. यावेळी शहर वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांनी धावत जाऊन वाद सोडविला. त्यानंतर त्यांना जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पाठविले.