बनावट नोटीस तयार करुन ‘वक्फ’ न्यायालयात याचिका दाखल

0

धुळे । शहरातील मच्छीबाजार येथे उभारण्यात येत असलेल्या आझादनगर पोलिस ठाण्याच्या बांधकामाविरुध्द एक याचिका औरंगाबाद वक्फ न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी मनपा उपायुक्तांच्या चक्क बोगस, खोट्या सह्या करुन महापालिकेच्या नावाने बनावट नोटीस बजावण्यात आल्याचा दावा आमदार अनिल गोटे यांनी केला असून आझादनगर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्याची तक्रार याप्रकरणी मनपा अभियंता जगदाळे यांनी केल्याची माहिती एका पत्रकाव्दारे आमदार गोटेंनी दिली आहे. धुळे शहरातील विकास कामांना या ना त्याप्रकारे अडथळा आणला जात आहे. शहरात विकास कामे होवू नयेत हे शहर असेच अविकसीत, मागासलेले रहावे यासाठी विरोधकांचे प्रयत्न सातत्याने सुरुच असतात. अधिकार्‍यांचे मनोबल खच्चीकरण करणे, माहितीच्या अधिकाराच्या धमक्या देवून खंडणी मागणे हा तर काहींचा जन्मसिध्द हक्कच असल्याप्रमाणे वागत असतात. खोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले की, खंडपिठाकडे जावून काही लक्ष वळविण्याचा प्रयत्न केले जात असल्याची टिकाही आमदार गोटेंनी विरोधकांवर केली.

मुख्यमंत्री येणार
बोगस, खोटी बनावट नोटीस तयार करुन सार्वजनिक बांधकाम विभागास देण्यात आली आहे. आझादनगर पोलिस स्टेशनचे मच्छिबाजार चौकातील बांधकाम तब्बल तीन मजल्यांपर्यत पुर्णत्वास आले आहे. अतिशय भव्य व सुंदर असे महाराष्ट्रातील हे एकमेव पोलिस स्टेशन असेल. लॉकअप, पार्किंग, पोलिस अधिकार्‍यांची कार्यालय, विश्रांतीगृह, वाचटॉवर बांधून झाले. पूर्ण इमारत महिना भरात तयार होईल. या पोलिस स्टेशनच्या अनावरणास नोव्हेंबर महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येण्याचे मान्य केले आहे.

आमदार अनिल गोटेंचे विरोधकांवर आरोप
प्रशासकीय मान्यता
कुठलेही काम होवूच द्यायचे नाही, अशा विकृत मनोवृत्तीने पछाडलेल्या विरोधकांनी खालची पातळी गाठली याचा उलगडा करणारी तक्रार मनपा आयुक्तांचे अनुमतीने पालिकेचे अभियंता बी.डी.जगदाळे यांनी आझादनगरपोलिस स्टेशनमध्ये दिली आहे. तक्रारीनुसार, मच्छिबाजार चौकात आझाद नगर पोलिस स्टेशन बांधण्यासाठीचा ठराव करुन महापालिकेने भुखंड दिला असून बांधकामाला शासनाची प्रशासकीय मान्यताही आहे.

वक्फ बोर्डात दावा
त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधकाम सुरु आहे. इकबाल अहमद रज्जाक, अब्दुल मुनाफ, अब्दुल शेख यांनी औरंगाबाद वक्फ बोर्ड येथे हे बांधकाम करु नये असा दावा दाखल केला आहे. या दाव्यात मनपा आयुक्त, पोलिस अधिक्षक, कार्यकारी अभियंता सार्वजनिकबांधकाम, महाराष्ट्र वक्फ बोर्ड यांच्यावर दावा दाखल केले आहे.