बनावट पासपोर्टप्रकरणी छोटा राजनला सात वर्षांचा तुरुंगवास

0

मुंबई । कुख्यात गुंड छोटा राजन याला मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाने सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. दिल्लीतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने काल या प्रकरणात छोटा राजनसह तीन पासपोर्ट अधिकारी दोषी असल्याचा निकाल दिला होता. त्यानंतर आज न्यायालयाने त्यांच्या शिक्षेची सुनावणी केली. त्यानुसार छोटा राजनसह तीन दोषी अधिकार्‍यांची सात वर्षांसाठी तुरूंगात रवानगी करण्यात आली आहे. तसेच या सर्वांना प्रत्येकी 15 हजार रूपयांचा दंडही ठोठाविण्यात आला आहे.

गेल्यावर्षी 8 जुनला छोटा राजन उर्फ राजेंद्र सदाशिव निकाळजे याच्यासह पासपोर्ट अधिकारी जयश्री रहाटे, दीपक शहा , ललिता लक्ष्मणन यांच्यावर गुन्हेगारी खटला दाखल करण्यात आला होता. या सगळ्यांवर फसवणूक, खोटी सही करणे आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याचे आरोप ठेवण्यात आले होते. सीबीआयने न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात छोटा राजन याला 1999 साली बंगळुरूमधून मोहन कुमार या बनावट नावाने पासपोर्ट देण्यात आला होता. रहाटे, शहा आणि ललिता लक्ष्मणन यांच्या मदतीने राजनने हा पासपोर्ट तयार करवून घेतला होता. छोटा राजन याच्या नावावर खंडणी, तस्करी, अंमली पदार्थांची वाहतूक आणि खुनाचे एकुण 85 गुन्हे आहेत.

इंडोनेशियन पोलिसांनी केली होती बालीमध्ये अटक
ऑक्टोबर 2015 मध्ये जेव्हा छोटा राजन ऑस्ट्रेलियाहून इंडोनेशियाला पोहोचला, तेव्हा इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली. इंडोनेशियन पोलिसांनी त्याला बालीमध्ये अटक केली. त्यानंतर नोव्हेंबर 2015 मध्ये त्याला भारताकडे सोपवलं.

राजन तिहार जेलमध्ये कैद
छोटा राजन सध्या दिल्लीच्या तिहार जेलमध्ये कैद आहे. त्याची सुरक्षा लक्षात घेऊन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी केली जाते.