बनावट पॉकीट व बेल्टची जळगावात विक्री : दोन जणांवर गुन्हा दाखल

भुसावळ/जळगाव : लेव्हीस कंपनीचे बनावट व हुबेहुब लेबल लावून कंपनीची फसवणूक करणार्‍या दोन जणांवर शहर पोलिसांनी कारवाई करीत सुमारे आठ लाख 94 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शहरातील बळीराम पेठ आणि गोलाणी मार्केट परीसरात लेव्हीस कंपनीच्या नावाने बनावट बेल्ट व पॉकीट विक्री होत असल्याची माहिती या कंपनीचे फिल्ड ऑफीसर सिध्देश सुभाष शिर्के (30, रा.शामनगर, जोगेश्वरी पूर्व मुंबई) यांना मिळाली. त्यानुसार सिध्देश शिर्के आणि सहकारी सचिन रमेश गोसावी यांनी खातरजमा करून शहर पोलिस ठाण्यात जावून माहिती दिली. त्यानुसार जळगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी सहाय्यक पोलीस संदीप परदेशी, डीबी पथकातील उमेश भांडारकार, विजय निकुंभ, रतहरी गीते, प्रणेश ठाकूर यांचे पथक तयार करून कारवाईच्या सुचना दिल्या.

नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त
त्यानुसार पथकाने बुधवार, 23 मार्च रोजी सायंकाळी शहरातील बळीरामपेठ येथील कलाशंकर अपार्टमेंटमधील विशाल प्लॉस्टीकच्या समोरील पाटे जनरल स्टोअर्स आणि गोलाणी मार्केटमधील हनुमान मंदीराजवळ याठिकाणी छापा टाकला. लेव्हीस कंपनीच्या नावाने बनावट व हुबेहुब असलेले विविध रंगाचे पाकीट आणि विविध रंगाचे बेल्टचा मोठा साठा आढळून आला. यात सुमारे आठ लाख 94 हजार 200 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी सिध्देश सुभाष शिर्के (30) यांच्या फिर्यादीवरून किशोर रामचंद पाटे (56, रा.बळीराम पेठ) आणि धीरज रमेश बागवाणी (45, रा.गायत्री नगर, जळगाव) यांच्या विरोधात जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉस्टेबल रवींद्र सोनार करीत आहे.