धुळे- शहराचे आमदार अनिल गोटे यांच्या नावाने सोशल मिडियावर खोटी पोस्ट तयार करण्यात येवून जनतेत गैरसमज पसरविण्यात आला. शिवाय सर्जिकल स्ट्राईकवर आक्षेप घेवून जवानांची बदनामी करण्यात आली. त्यामुळे ती पोस्ट तयार करणार्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार अनिल गोटे यांनी थेट पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्याकडे केली आहे. तसेच ते सर्वोच्च न्यायालयातदेखील याचिका दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत गोटे यांनी पत्रक प्रसिध्दीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सद्यास्थितीत धुळे महानगरपालिकेच्या निवडणुका येवू घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा. माझ्या सर्व कार्यकर्त्यांबद्दल अविश्वासाची भावना निर्माण व्हावी व आम्ही सर्वांना पक्ष बदलू, ठरवून आमच्याबद्दल मतदरांमध्ये आणि समाजामध्ये घृणा निर्माण होण्याच्या हेतूने हे कृत्य करण्यात आले. गंभीर बाब म्हणजे या पोस्टमध्ये सर्जिकल स्ट्राईकला नकली म्हणण्यात आले आहे. हे वाक्य म्हणजे जवानांच्या शौर्याचा अवमान आहे, असेही गोटे यांनी पत्रकात म्हटले आहे.