नंदुरबार : बनावट वाहने नोंदणी प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला औरंगाबादचा सलीम खान अजूनही सापडत नसल्याने त्याला शोधण्यासाठी वेगवेगळे पथक कामाला लागले आहेत. या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी प्रादेशिक विभागाचे एक पथक नंदुरबार येथे नुकतेच येऊन गेले.
बनावट नोंदणीची 22 वाहने जप्त
बनावट वाहने नोंदणी प्रकरणी नंदुरबार येथील उप प्रादेशिक कार्यालयातील दोन कर्मचार्यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले असून त्यांची ही विभागीय चौकशी करण्यात येत आहे. परीवहन आयुक्तांनी या प्रकरणाचा तपास नंदुरबारचे परीवहन अधिकारी किरण बेडकर यांच्याकडे सोपविला आहे. त्यांना मदत करण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातील अधिकार्यांचे एक पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकाने गुरुवार, 29 सप्टेंबर रोजी नंदुरबार येथील उपप्रादेशिक कार्यालयात येऊन आढावा घेतला. दरम्यान आतापर्यंत बनावट नोंदणीची 22 वाहने जप्त करण्यात आली असून नोंदणी नसलेली परंतु रस्त्यावर फिरणारी काही वाहने बाद करण्यात आली आहेत.
मास्टर माईंडला अभय कुणाचे ?
नंदुरबार येथील कार्यालयातील कर्मचार्यांचा पासवर्ड वापर करून वाहनांची बनावट नोंदणी करण्यात आली आहे. वाहने ट्रान्सफर करणे, आरसी बुक तयार करणे, ही सर्व कामे औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, जळगाव आदी जिल्ह्यातून झाली आहेत. या प्रकरणी दोषी असलेल्या काही एजंटांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मात्र या प्रकरणाचा मास्टर माईंड असलेला औरंगाबादचा सलीम खान अजूनही गवसत नसल्याची खंत उपप्रादेशिक परीवहन अधिकारी किरण बेडकर यांनी व्यक्त केली. सलीम खान याला शोधण्यासाठी सायबर पोलिसांचे पथक त्याचप्रमाणे आरटीओ विभागाचे पथकदेखील कामाला लागले आहे. तो सापडल्यास या प्रकरणाची सत्यता बाहेर येणार आहे. दरम्यान मास्टर माईंड असलेला सलीम अजूनही सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्याला अभय तर दिले जात नाही ना? असाही प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होऊ लागला आहे.