बनावट विदेशी मद्याचा साठा हॉटेलमध्ये पकडला :  किनोद गावात कारवाई

Fake liquor worth 70 thousand caught at Kinod जळगाव : राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकत 66 हजार 130 रुपये किंमतीचे बनावट मद्य जप्त केल्याने खळबळ उडाली. जळगाव तालुक्यातील किनोद येथे बस स्थानकावरील यशपाल हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली. बनावट देशी, विदेशी दारुच्या 938 बाटल्या जप्त करण्यात आल्या असून या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली. अशोक भिला सोनवणे (42, रा.चांदसर, ता.धरणगाव, ह.मु.कांचन नगर, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव तालुक्यातील किनोद येथे बस स्थानकावरील यशपाल हॉटेलमध्ये बनावट मद्याची विक्री केली जात असून मद्याची साठवणूक करण्यात आल्याची राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने मंगळवारी रात्री उशीरा या हॉटेलवर छापा टाकून देशी व विदेशी मद्याच्या 938 बाटल्या जप्त केल्या तर दारु बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

यांनी केली कारवाई
विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ व अधीक्षक जितेंद्र गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक सी.एच.पाटील, दुय्यम निरीक्षक ए.एस.पाटील, एस.आर.शेलार, एस.बी.भगत, सतीश पाटील यांच्यासह कॉन्स्टेबल एन.व्ही.पाटील, ए.व्ही.गावंडे, एम. डी.पाटील, के.पी.सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.