धुळे । शिंदखेडा तालुक्यातील बनावट शाळांप्रकरणी सुरु असलेले आत्मक्लेष आंदोलनास धुळे शहराचे आमदार व पंचायत राज समितीचे सदस्य अनिल अण्णा गोटे यांनी तातडीने भेट दिली असून, बनावट शाळांच्या प्रश्नावर निर्णय झाल्याशिवाय पंचायत राज समितीचे कामकाज चालू देणार नाही, असे आश्वासन आ. गोटे यांनी दिले आहे. जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात डाबली-धांदरणे, दभाषी आणि बाभळे येथे गेल्या दोन वर्षांत बनावट कागदपत्रांच्या आधारे माध्यमिक व प्राथमिक शाळांचे स्थलांतर झालेले आहे. प्रत्यक्षात या शाळा 2013 मध्ये स्थलांतर झाल्याची कागदपत्रे शिक्षण विभागाच्या कर्मचार्यांना हाताशी धरून तयार केलेली आहेत.
अंतिम निर्णयानंतर आंदोलन मागे
आंदोलनास जयवंतराव बोरसे, किशोर श्रीराम पाटील यांनी पाठिंबा व्यक्त केला. संस्था चालकांवर तसेच कर्तव्यात कसूर करणार्या अधिकार्यांवर त्वरित कारवाई होणे आवश्यक आहे. परंतु, याबाबत अंतिम निर्णय झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत आत्मक्लेष आंदोलन मागे घेणार नाही, असे पत्रक आंदोलनकर्ते दिनेश गुलाबराव पाटील, शरद पंडीतराव पाटील, गणेश हिम्मतराव देसले, नंदू रावण पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे. एकाही शिक्षक कर्मचार्यास आपण मान्यता दिलेली नाही असे शिक्षणाधिकारी माध्य. यांनी लेखी दिलेले आहे.
पुरावे देवूनही कारवाई नाहीच
याबाबत वेळोवेळी पुरावे देवून देखील सदर शाळांचे कामकाज शिक्षण विभागाच्या कृपादृष्टीमुळे सुरू आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देखील सदर प्रकरण राजकीय असल्याचे सांगत कारवाईस टाळाटाळ केल्याने आंदोलनास प्रारंभ करण्यात आला. सदर संस्था सन 2013 ते 2015 या काळात बंद होत्या. त्यांचे मूल्यांकन झालेले नाही. केवळ तत्कालिन शिक्षण आयुक्तांच्या शिफारसीने या शाळांना 1 जुलै 2016 च्या शासन निर्णयात अनुदानास पात्र ठरविण्यात आले आहे. प्रत्यक्षात या शाळांनी अनुदानासाठी प्रस्तावच सादर केलेला नाही.