बनावट सोने देत गंडवणारी टोळी धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता : सहा लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त

धुळे : नकली सोने देवून व्यापार्‍यांसह नागरीकांना गंडवणारी राजस्थानी टोळी धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकली आहे. या टोळीने पिंपळनेरमधील व्यापार्‍यासह सटाणा तालुक्यातील इसमासही ठगवल्याचे उघड झाले आहे. या टोळीच्या चौकशीतून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जितेंद्रकुमार लालारामजी वाघोला (35, पंचायत वाली बागरा, तहसील जि.जालोर, राजस्थान) व मांगीलाल हिराराम वाघरी (42, बागरीया का वास सिवणा, तहसील जि.जालोर, राजस्थान) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. संशयीताच्या ताब्यातून सहा लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शेतात सोने सापडल्याचे सांगून व्यापार्‍यास ठगवले
पिंपळनेर येथील तक्रारदार दीपक प्रभाकर भामरे यांचे पिंपळनेर येथे प्रथमेश ट्रेडर्स नावाचे दुकान असून बुधवार, 28 रोजी एका अनोळखी इसमाने आपले नाव राजू मिस्तरी असून आपल्याला पैशाची गरज असून आपल्याकडील सोन्याचे पदक खरेदी करण्याची विनंती केली. भामरे यांनी पदक तपासल्यानंतर ते सोन्याचे असल्याची त्यांची खात्री झाली. आपल्या शेतात खोदकामात सोने सापडले असून तेदेखील आपणास विकायचे आहे, असे संशयीताने भामरे यांना सांगून त्यांचा विश्‍वास बळकावला. शुक्रवार, 30 रोजी भामरे यांना साक्री येथे बोलावत चार लाखांची रक्कम उकळत बनावट ओम पान देवून संशयीताने पळ काढला. या प्रकरणी भामरे यांच्या तक्रारीनुसार पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचप्रमाणे गुरुवारी, 29 रोजी पंकज हिरामण गंगावणे (अलियाबाद, ता.सटाणा) यांच्याकडून देखील अडीच लाख घेत बनावट सोने देवून फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी देखील पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल होता.

गोपनीय माहितीवरून राजस्थानी टोळी जाळ्यात
गुन्हा घडल्यानंतर संशयीत धुळ्याच्या दिशेने पसार झाल्याची सहा.निरीक्षक साळुंखे यांनी गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना दिल्यानंतर पथकाकडून संशयीतांचा शोध सुरू करण्यात आला. साक्री बायपास रोडवरील हॉटेल भंडाराच्या पाठीमागे काही नवीन लोक पालं ठोकून राहत असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी तेथे धाव घेत असता दोन संशयीत पसार होत असतानाच त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. संशयीत जितेंद्रकुमार वाघोला व मांगीलाल वाघरी यांनी दोन्ही गुन्हे आपल्या सहकार्‍यांसह केल्याची कबुली देत सहा लाख 46 हजार 500 रुपयांची रोकड, एक किलो 632 ग्रॅम पिवळ्या वजनाचा धातू, 964 ग्रॅम वजनाची पिवळ्या रंगाची धातूची माळ, पांढर्‍या रंगाचा इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटा, सात मोबाईल, आधारकार्ड मिळून सहा लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहा.निरीक्षक सचिन साळुंखे, सहा.निरीक्षक दिलीप खेडकर, सुशांत वळवी, प्रभाकर बैसाणे, रफिक पठाण, अशोक पाटील, संदीप सरग, गौतम सपकाळे, राहुल सानप, मयूर पाटील, तुषार पारधी, श्रीशैल जाधव, सुनील पाटील, मनोज महाजन, कविता देशमुख, भूषण वाघ व रवींद्र सूर्यवंशी आदींच्या पथकाने केली.