फसवणुकीचा प्रकार असताना केवळ मारहाणीची तक्रार ; बनावट स्वाक्षरी करणारे डॉक्टर कोण? ; रुग्णालय व्यवस्थापनाकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
जळगाव- परस्पर शिक्के मारुन बनावट स्वाक्षरी व्दारे निरोगी असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविले जात असल्याचा गंभीर मंगळवारी जिल्हा रुग्णालयात समोर आला. याप्रकरणात संबधित सुरक्षारक्षकात विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल न करता केवळ मारहाणीबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाप्रकारे बनावट स्वाक्षरी करुन वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याच्या गंभीर प्रकारात जिल्हा रुग्णालयातील काही डॉक्टरांचाही सहभाग असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असून ‘तेरी भी चूप मेरी चूप’ मुळे केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करुन प्रकरण दडपले जात आहे.
रेल्वेत अप्रेटींसशीपसाठी आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी यावल येथील तीन तरुणांनी जिल्हा रुग्णालयात प्रकरण तयार केले. या तरुणांनी जिल्हा रुग्णालयातील खाजगी सुरक्षा रक्षक समाधान तुकाराम सोनवणे याच्या माध्यमातून प्रकरणावर परस्पर सिव्हील सर्जन यांचा शिक्का मारुन घेतला. तसेच त्यावर जिल्हा शल्य चिकित्सकांची स्वाक्षरी आवश्यक असल्याने त्यांची बनावट स्वाक्षरी करण्यात आली. जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी रविंद्र कृष्णा बागुल यांच्याकडे संबंधित प्रकरण तपासणीसाठी गेले असता शिक्का चोरल्याचा तसेच बनावट स्वाक्षरीचा प्रकार समोर आला होता. याचा जाब विचारल्याचे वाईट वाटल्याने सुरक्षा रक्षक समाधान सोनवणे याने रविंद्र कृष्णा यांना मारहाण केली होती. गोंधळ उडाल्याने जिल्हापेठ पोलिसांना पाचारण करुन सोनवणे यास त्यांच्या ताब्यात देण्यात आले होते.
काय आहे पोलिसात तक्रार
200 रुपयांसाठी सुरक्षारक्षकाने केला प्रकार
परस्पर शिक्का मारुन त्यावर बनावट स्वाक्षरी करुन वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी सुरक्षा रक्षकाने संबंधित तिघांकडून 200 रुपये घेतल्याची माहिती मिळाली आहे. अशाप्रकारे यापूर्वी पैशांची देवाणघेवाण होवून अनेक बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. अपंग दाखले देण्यासाठी जिल्हा रुग्णालयात दलाल सक्रिय असल्याचे यापूर्वी अनेकदा समोर आले आहे.
डॉक्टरांचाही सहभागाची शक्यता
जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर चौकशीदरम्यान समाधान सोनवणे याने शिक्का तसेच स्वाक्षरी एका डॉक्टरने केल्याची माहिती दिली होती. त्यानुसार पोलिसांनी संबधित डॉक्टरालाही चौकशीसाठी बोलावून घेतले. मात्र डॉक्टरने चक्क खाजगी सुरक्षा रक्षकाला ओळखत नसल्याचे सांगितले. संबंधित डॉक्टरनेच स्वाक्षरी केल्याचा समोर आल्यानंतर तेरी चूप मेरी चूप म्हणत, केवळ अदखलपात्र गुन्हाच दाखल झाल्याचेही समजते.
का दडपले जातेय प्रकरण?
जिल्हा शल्य चिकित्सकांची बनावट स्वाक्षरीचा प्रकार गंभीर आहे. त्याच्या स्वाक्षरीच्या आधारावर अनेक कागदपत्रे तसेच दाखले मंजूर होतात. प्रकरण दडपले जाणे म्हणजे संबंधित प्रकाराला खतपाणी देण्यासारखे आहे. यापुढेही कोणीही जिल्हा शल्य चिकित्सक किंवा अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांची स्वाक्षरी करुन कुठलेही दाखले मिळवू शकतो, त्यामुळे याप्रकरणात कारवाई होणे गरजेचे असतांना केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाल्याने रुग्णालय व्यवस्थापनावरच संशय व्यक्त होत आहे.
प्रतिक्रिया
बनावट स्वाक्षरीचा प्रकार अतिशय गंभीर असून माझ्या निदर्शनात आले आहे. महावीर जयंती निमित्त सुटी त्यात मे बाहेर गावी असल्याने सविस्तर माहिती घेता आली नाही. मात्र या प्रकरणी चौकशी करण्यात येवून त्यात तत्थ आढळून आल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल – आधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे
माझी बनावट स्वाक्षरी करण्यत आल्याच्या प्रकाराबाबत अनभिज्ञ असून या प्रकरणी माहिती घेवून पोलिसांत गुन्हा दाखल करणार आहे. या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. – डॉ. किरण पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक