पंचायत समितीत नाराजीचा सूर
श्रीगोंदा : श्रीगोंदा पंचायत समितीच्या निकालानंतर माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी सभापती आणि उपसभापतीपदासाठी काही विजयी उमेदवारांना दिलेला शब्द पाळला नाही त्यामुळे पाचपुते समर्थकात मोठी नाराजी पसरली आहे.
श्रीगोंदा पंचायत समिती निवडणूक निकालानंतर माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी पंचायत समितीवर वर्चस्व मिळवले. यावेळी पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच झाली होती तर कोणत्याही शर्तीवर आपणाला पद मिळाले पाहिजे यासाठी विजयी उमेदवार आक्रमक झाले होते. मात्र सर्वाना शांत करत पाचपुते यांनी त्यावेळी सभापती पद कोळगाव गटातील पुरुषोत्तम लगड तर उपसभापती पद पेडगाव गटातील प्रतिभा गणेश झिटे यांना सुरवातीला दीड वर्षासाठी मात्र काही काळातच ते एक वर्षासाठी असेही ठरविण्यात आले. या दोघांचा कार्यकाळ संपला की आढळगाव गटातील मनीषा कोठारे आणि पारगाव गटातील शहाजी हिरवे यांची वर्णी लागणार होती. मात्र आता ही निवड होऊन तब्बल 2 वर्षे उलटली आहेत. तरीही माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्याकडून दिलेला शब्द पाळला गेल्या नसल्यामुळे पाचपुते समर्थकांत नाराजी पसरली आहे; तर काही जण पाचपुते याना सोडून जाण्याच्या तयारीत आहेत.