चांगल्या कलावंताना घडवून खान्देशलाच मुंबई करणार; फेम गायक अण्णा सुरवाडे
शरद भालेराव ,जळगाव : जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात यंदा लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीसोबत लग्नसराईत सध्या तरुणाईसह आबालवृद्धांना वेड लावणार्या ‘ वं मनी माय बबल्या ईकस केसावर फुगे’ या अहिराणी गाण्याने सर्वत्र चांगलीच धुम उडवत ठेका धरला आहे. ‘यु ट्यूब’वर या गाण्याला अवघ्या काही दिवसातच कोटींच्यावर ‘व्हिवर’ मिळाले आहेत. दिग्दर्शक आणि संगीतकार सचिन कुमावत यांच्यासह सर्व टीमच्या मेहनतीमुळे गाण्याला मिळत असलेला प्रतिसाद आणि कोटींवर व्हिवर गेल्याचे गाण्याचे गायक, गीतकार आणि अभिनय करणारे जामनेरचे रहिवासी अण्णा सुरवाडे यांनी सांगितले. जळगावस्थित दै.‘जनशक्तिच्या’ कार्यालयास नुकतीच त्यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी अतिशय मनमोकळ्या गप्पा करत दिलखुलास मुलाखतही दिली.
वर्हाडींनी धरला ठेका
गाण्याविषयी ते म्हणाले, या गाण्याचे चित्रीकरण जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे करण्यात आले आहे. गाण्याने तरुणाईपासून ते अबालवृद्धांपर्यंत अक्षरशः वेड लावले आहे. लग्नसराईत तर गाण्याने धुम करत वर्हाडी मंडळी बेधुंद होऊन ठेका धरत आहे. ग्रामीण भागात विवाहात उपस्थितीसाठी गेल्यावर मला बघितल्यावर लहान मुलांपासून सर्वच गाणे गाण्याची मागणी आता करु लागले आहे.
कोटींवर व्हिवर मिळाल्याचे समाधान
यापुर्वी ‘भीमसागर’ नावाचा अल्बम, छत्रपती शिवाजी महाराजांवरील गाणे, ‘संविधानाचा श्रृंगार’ नावाचा अल्बम, ‘प्रेम…प्रेम’ हे मराठी गीत, जिजाऊ वंदना यांनाही रसिकांकडून दाद मिळाली आहे. आगामी आकर्षणांमध्ये ‘नवा आधार’ या चित्रपटात ‘गणपती बाप्पा… नाचत गणेश आला’ हे गीत तर मराठीतून ‘सोनू-मोनू’ नावाचा अल्बम लवकरच रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लहानपणापासूनच गाणे तयार करणे आणि गाण्याची आवड होती. पथनाट्य सादर करण्यापासून सुरु झालेला प्रवास तो आज ‘यु ट्यूब’वरील कोटींवर व्हिवर मिळाल्याचे समाधान आहे. या यशात जामनेरातील सर्व पत्रकार बांधवांचे निश्चित सहकार्य मिळाले आहे. त्यातच पत्रकार स्व.सतीश जाधव आणि स्व.शिवाजी झाल्टे यांचा त्यांनी भावनिक होऊन आवर्जून उल्लेख केला.
रसिकांनी गीताला उचलले डोक्यावर
काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागात सायकलवर फिरुन केसावर फुगे विकले जाणारा दृष्टीस पडत होता. जो आज समाजातून कालबाह्य झाल्याचे प्रकर्षाने दिसते. अशाच दृश्याची कल्पना करुन त्यावर गाणे बनविण्याचा विचार केला. सुरवातीला अनेकांनी मला काय, ‘अण्णा तुम्ही पण कसलेही गाणे तयार करतात’, असे म्हणत अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पण मी यावर गाणे तयार करण्याचा ठाम विचार केला. गाणे मराठीत न करता ते अहिराणी करण्याचाही विचार होता. अशातच सुचलेली कल्पना प्रत्यक्षात उतरुन तिला टीमवर्कने केलेल्या मेहनतीमुळे गीताला आज मिळालेला प्रतिसाद पाहून अनेकांनी या गीताला डोक्यावरच उचलले आहे. यापूर्वीही माझी 4 गाणी हिट झाली आहेत. त्यात ‘तुज कॉलेज सुटल्यावर मला आय लव्ह यू म्हणशील का’, ‘मामी तुमची मुलगी लई सुंदर’ या गाण्यांचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. यासोबत नुकताच प्रदर्शित झालेला ‘विश्वविधाता’ या चित्रपटातही ‘सुखाचा केला त्याग’ हे गीत गायले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही या चित्रपटात गीत गायिले असल्याचे अण्णा सुरवाडे यांनी सांगितले.
टीमवर्कमुळे गाण्याला तुफान यश
गाण्याच्या टीमवर्कमध्ये शेंदुर्णीचे संगीतकार सचिन कुमावत, नृत्य दिग्दर्शक समाधान निकम, पहूरचे कॅमेरामन ऋषीकेश चौधरी, वाकोदचे निर्माता कृष्णा जोशी, वेशभुषा सोनू थोरात तसेच बाळू वाघ, राहुल गुजर, सोनू चौधरी, शेरीचे विजय बनकर, चाळीसगावचे संजू सोनवणे, राहुल धुळे अशा सर्वांच्या मेहनतीमुळे गाण्याला तुफान यश मिळाले आहे. यापुढेही चांगले टीमवर्क करुन नवनवीन विषयांवरील दर्जेदार गाण्यांसाठी प्रयत्न राहील. यासोबतच रसिकांना आवडणार्या विषयांवरही लक्ष केंद्रित करण्यावर भर असल्याचेही गायक सुरवाडे म्हणाले.
चित्रपट बनविण्याचा मानस
आज अनेक नवोदित कलावंत उदयास येऊ लागली आहेत. त्यांनीही चांगले ध्येय समोर ठेवून उत्कृष्ट सादरीकरण केले पाहिजे. विशेष म्हणजे आगामी प्रवासात चांगला संगीतकार मिळाल्यास त्याच्या माध्यमातून यापुढेही चांगली दर्जेदार गीते देण्यावर भर राहील. आगामी काळात खान्देशातील चांगले कलावंत घेऊन चित्रपट बनविण्याचा मानस आहे. त्यातूनच चांगल्या कलावंताना घडवून खान्देशलाच मुंबई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.