धुळे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गस्ती पथकाने शिरपूर तालुक्यात 6 लाख 86 हजार रुपये किंमतीचे बनावट दारु तयार करण्यासाठी लागणारे स्पिरीट पकडले असून वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे. आज शिरपूर तालुक्यातील बभळाज शिवारात चोपडा रोडवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक गस्तीवर असतांना हॉटेल धरती गार्डनजवळ त्यांच्या नजरेस एम.एच.19 एस.8534 क्रमांकाची 407 गाडी पडली. त्यांनी गाडीची तपासणी केली असता त्यांना गाडीमध्ये 200 लिटर्स क्षमतेचे 14 बॅरल्स स्पिरीटने भरलेले आढळून आले. या स्पिरीटची किंमत 6 लाख 86 हजार रुपये आहे. पथकाने साडेतीन लाख रुपये किंमतची 407 गाडी देखील जप्त केली आहे. वाहन चालक जितू रमेश पावरा, (वय 25, रा.मोहिदा ता.शिरपूर ) याला ताब्यात घेतले आहे.
कुठून आले?, कुठे चालले?
राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक एम.एन.कावळे, डी.एम.चकोर, व्ही. बी. पवार, बी.एस.कोरजे, अनिल बिडकर,अनिल निकुंभे, किरण वराडे, प्रशांत बोरसे, अमोल धनगर, भालचंद्र वाघ, रविंद्र देसले, विजय नाहिदे यांच्या पथकाने ही कारवाई केली. सदरचे स्पिरीट हे कुठून भरले व कोठे नेण्यात येत होते याचा तपास दुय्यम निरीक्षक बी. एस. कोरजे करीत आहेत.