पुंछ- जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये बर्फाच्या वादळात अडकल्याने एका जवानाचा मृत्यू झाला आहे. एक जवान यात गंभीररित्या जखमी झाला आहे. गुरुवारी पुंछमध्ये सीमेवर असलेल्या एका भारतीय चौकीवर हे बर्फाचे वादळ येऊन धडकले. त्यामध्ये हे जवान गाडले गेले होते. येथे सध्या उणे चार डिग्री तापमान आहे.
या घटनेनंतर तत्काळ लष्कर आणि पोलिसांकडून बचाव मोहिम राबवण्यात आली. ज्यामध्ये अडकलेल्या दोन्ही जवानांना बाहेर काढण्यात आले. मात्र, तोपर्यंत एका जवानाचा मृत्यू झाला होता तर दुसरा गंभीर जखमी अवस्थेत होता. हिमाचल प्रदेशचे रहिवासी असलेले लान्स नायक सपन मेहरा यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. तर पंजाबचे शिपाई हरप्रीत सिंह यांना यामध्ये गंभीर जखमा झाल्या आहेत. हरप्रीत यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.