रावेर- गेल्या दहा दिवसांपासून बर्हाणपूर व नेपानगर विधानसभेसाठी सुरू असलेला राजकीय रायरंगाचा बाजार सोमवारी सायंकाळी पाच वाजता थंड होणार आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध राष्ट्रीय पक्षाचे मुखवटे लावून आश्वासनांचा बाजार मागील दहा-बारा दिवसांपासून भरला होता. निवडणुकीसाठी भाजपासह काँग्रेस पक्षाने दिल्ली, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, गुजरातमधून कधी न दिसणार्या लोकप्रतिनिधींना पाचारण केले होते. ही मंडळी मतदारांच्या घराच्या उंबरठ्यावर लोटांगण घालून आपल्या पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी साकडे घालत होते. सोमवारी सायंकाळी प्रचार थांबणार असून पुन्हा ही राजकीय मंडळी कायमची पाच वर्षासाठी निघून जाणार आहे. मध्यप्रदेशामध्ये यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची चुरशीची होत असून भाजप आणि काँग्रेस यांच्यात सरळ-सरळ लढत होत आहे. मागील दहा ते बारा दिवसांपासून बर्हाणपूर व नेपानगर मतदारसंघ दोन्ही पक्षांच्या मातब्बर नेत्यांकडून ढवळून निघाला आहे. कधीही मतदारांना न दिसणारे विविध पक्षाचे राष्ट्रीय लोकप्रतिनिधींनी आश्वासने दिली असलीतरी ती कितपत खरी ठरतात हे येणारा काळच ठरवणार आहे. बर्हाणपूर आणि नेपानगर या दोन्ही मतदारसंघासाठी येत्या बुधवार, 28 रोजी मतदान होणार आहे.