बर्हाणपूर-अंकलेश्वर रस्त्याचे लवकरच होणार काम ; तातडीने निविदा काढण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे आदेश
फैजपूर- बर्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाच्या दुरवस्थेवरून लोकप्रतिनिधींवर चांगलीच टिका होत होती. रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी मुंंबईतील विधानभवनात पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे रस्त्याबाबत गार्हाणे मांडण्यात आले. पालकमंत्र्यांनी या गंभीर बाबीची दखल घेत रावेर-यावल तालुक्यातून जाणार्या बर्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाच्या दुरुस्तीबाबत तातडीने निविदा काढण्याचे आदेश संंबंधित विभागाला दिले. माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाशिक विभागाचे मुख्य अभियंता हेमंत पगारे, राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता विनय देशपांडे, जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे आदींच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
जीर्ण पुलांच्या नूतनीकरणाचे आदेश
पालकमंत्र्यांच्या उपस्थिती झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी समस्या मांडल्या. डी.पी.डी.सी. मध्ये मागणी केल्याप्रमाणे पालकमंत्र्यांनी रस्ता टीकाऊ होण्यासाठी व जनतेच्या वाहतुकीची सोय होण्याकरीता हायब्रीड अॅन्युइटीमध्ये प्रस्तावीत करून डी.पी.आर.तयार करण्याबाबत व त्वरीत निविदा काढण्याबाबत आदेश दिले तसेच बर्हाणपूर-अंकलेश्वर रोडवरील अंदाजे 43 किलोमीटर इतक्या लांबीचा खराब असलेला भाग मार्च 2019 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची ग्वाही देत रस्त्यावरील जीर्ण झालेल्या सर्व पुलांची दुरुस्ती व नुतनीकरण पूर्ण होणार असल्याची हमीदेखील दिली. बर्हाणपूर-अंकलेश्वर राज्य मार्ग क्रमांक 04 रस्ता हायब्रीड अॅन्युइटीमध्ये तत्काळ प्रस्तावित होणार असल्याचेही आदेशही प्रसंगी देण्यात आले. दरम्यान, शिरागड-कोळन्हावी पुलामुळे चोपडा तालुक्यातून जळगावला जाण्यासाठी 35 किमीचा फेरा वाचणार असल्याने या भागातील नागरीकांना मोठा दिलासा मिळणार आहे.