बर्हाणपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवाराच्या प्रचाराची धुरा महाराष्ट्रासह गुजरातच्या लोकप्रतिनिधींवर
रावेर (शालिक महाजन)- मध्यप्रदेशातील बर्हाणपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी महाराष्ट्रसह गुजरातच्या लोकप्रतिनिधीनी प्रचार-प्रसाराची धुरा आपल्याकडे घेतली आहे. सर्वात जास्त मुस्लीम तसेच त्यानंतर माळी, मराठा व गुजर समाजाचे मताधिक्य असलेल्या या मतदारसंघात प्रचंड चुरशीची निवडणूक होत आहे. या मतदारसंघात भाजपाने महिला व बालविकास मंत्री अर्चना चिटणीस यांना रींगणात उतरवले आहे तर त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून काँग्रेसने रवींद्र महाजन यांना उमेदवारी दिली आहे परंतु खरी चुरशीची लढत शेरा भैया उर्फ राजेश ठाकूर यांच्या उमेदवारीने झाली आहे. बर्हाणपूर येथील राजकीय विश्लेषकांच्या मते शेरा भैया यांना मानणारा मोठा वर्ग मतदारसंघात आहे. काँग्रेस पक्षाचे तिकीट त्यांना अपेक्षित असताना रवींद्र महाजन यांना मिळाल्याने त्यांनी येथून अपक्ष उमेदवारी दाखल करून षड्डू ठोकले आहेत. भाजपाने मतदारसंघात चौफेर विकास केल्याने मतदारांकडून आपल्यालाच कौल मिळणार असल्याचा दावा अर्चना चिटणीस यांनी केला आहे या मतदारसंघावर मुस्लिम आणि मराठीबहुल मतदारांची प्रचंड पकड असल्याने भाजपाने महाराष्ट्र गुजरातच्या लोकप्रतिनिधींना येथून भाजपाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी पाचारण केले आहे.
खान्देशातून हे लोकप्रतिनिधी सांभाळताय धुरा
महाराष्ट्रातून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, आमदार हरीभाऊ जावळेे, जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटी मराठी बहुल भागात भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. गुजरात येथून खासदार सी.आर.पाटील, आमदार संगीता पाटील, वैशाली पाटील या गुजराती व मराठी लोकांना भाजपाचा विकासाची कामे पटवून देऊन मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. येथेे 28 नोव्हेंबरला मतदान होत असून निवडणुकीत कोण बाजी मारतो ? याकडे लक्ष लागले आहे.