बलकुवा ग्रामस्थांचे उपोषण सुरुच

0

शिरपूर। शिरपूर तालुक्यातील बलकुवा ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सरोज पाटील यांनी शिरपूर पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण मंगळवार 22 ऑगस्टपासुन सुरु केले असून त्यांना व्यापक जनसमर्थन व पाठींबा मिळत आहे. त्यांच्या विविध मागण्या वेळेत पुर्ण न झाल्यामुळे त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. आज त्यांचा उपोषणाचा तीसरा दिवस असून मागण्यांबाबत सखारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे व प्रशासनाचा खुलासा अमान्य असल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी उपोषण सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहील असे त्यांनी जाहीर केले आहे. दरम्यान पंचायत समितीतर्फे गट विकास अधिकारी, सहाय्य गट विकास अघिकारी, उपाध्यक्ष जि.प.व पं.स.चे उपाध्यक्ष, शिरपूर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन समाधान करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो फारसा यशस्वी झाला नाही. या वेळेस गावकरी मात्र आक्रमक भुमिकेत होते. त्यांनी विविध प्रकाराच्या आरोपांच्या फैरी झाडल्या.

ग्रामस्थांनी केल्या इतर मागण्या
त्यास समर्पक उत्तर देण्यास प्रशासन अपयशी ठरेल. यात प्रशासनाने प्रामुख्याने 177 बोगस लाभार्थ्यांना लाभ देण्यार्‍या अधिकारी व संबधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आश्‍वासन दिले. शिवाय शिल्लक लाभार्थ्यांपैकी 41 लाभार्थ्यांना तात्काळ लाभ देण्यात आला व त्यांचे धनादेश वितरणाचे काम सायंकाळपर्यंत केले. यातील अपात्र लाभार्थी वगळता इतरांना लाभ मिळाला आहे. मात्र गावात झालेला बेसलाईन सर्वे हा चुकीचा असुन त्यात नाव समाविष्ट झाल्यामुळे व काही लाभार्थ्यांना अंधारात ठेऊन बोगस लाभ मिळवल्यामुळे 112 लाभार्थी वंचित आहेत. मात्र याबाबत जिल्हा प्रशासनास अहवाल देऊ असे सांगण्यात आले. मात्र काही आश्‍वासने देण्यात आली. मात्र लिखीत स्वरुपात काही न मिळाल्याने आंदोलन सुरु ठेवण्यात आले. यातील आंदोलन कर्ते माधव फुलचंद दोरीक यांना ब्लड प्रेशरचा त्रास असल्याने त्यांना प्राथमिक उपचार करण्यात आला.

गावकर्‍यांनी वाचला तक्रारींचा पाढा
कुवे व बलकुवे गावात वितरीत झालेल्या 63 लाखांचा हिशोब सादर करावा, गावातील भरत महादू कोळी हे 2011 मध्ये मयत असतांना त्यांना 2014मध्ये लाभ देण्यात आला, लताबाई रंगराव पाटील या मागील दहा वर्षापासून गावात राहत नसुन त्यांची कोणतीही जमिन अथवा घर नसतांना लाभ देण्यात आला आहे. सरपंच यांच्यानावे 36 हजार रुपयांचा धनादेश देण्या आला आहे. त्यामुळे त्यांनी एकाच घरात तीन शौचालय बांधले का? ग्रामपंचायतीत 8 नं. व 9 नं. कोणतेही दप्पर उपलब्ध नाही असे अनेक प्रकारचे आरोप हे जाहिरपणे करण्यात आले.

आंदोलनाचे फलीत
संबधित प्रकरणात गैरकारभार करणार्‍या सरपंच व ग्रामसेवकांविरुध्द पोलीस कार्यवाहीची हमी, 41 लाभार्थ्यांना तात्ताकाळ धनादेश वाटप, बोगस लाभार्थ्यांना प्रकरणात चौकशीचे आश्‍वासन, बेस लाईन सर्वेत असल्यामुळे लाभ न मिळणार्‍यांना लाभ मिळण्याचा दिलासा, गुन्हा दाखल झाल्यास नियम बाह्य अग्रीम निधी वितरीत करणारे बडे अधिकार्‍यांवर चौकशी करण्याचे आश्‍वासन दिले.