बलकुवा ग्रामस्थांचे उपोषण समाप्त, अखेर दोषींवर गुन्हे दाखल

0

शिरपूर । तालुक्यातील बलकुवा ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या शौचालय घोटाळ्यातील दोषींवर कार्यवाही व पात्र लाभार्थ्यांना अनुदान या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सरोज पाटील व माधव फुलचंद दोरीक हे मंगळवार 22 ऑगस्टपासुन पंचायत समिती शिरपूर कार्यालया बाहेर आमरण उपोषणास बसले होते. मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही अशी भूमिका घेतल्यामुळे प्रशासनासमोर पेच निर्माण झाला होता. अखेर आठ दिवसांनी हा तीढा सोडण्यात प्रशासनाला यश आले आहे. याबाबत आंदोलकांच्या मागणीनुसार पात्र लाभार्थ्यांला अनुदान देण्याचे व अपात्र असलेल्यांना लाभ मिळवुन देण्याचे लेखी आश्‍वासन देण्यात आले आहे. विस्तारअधिकारी राजु झागा मोरे यांनी दिलेल्या फिर्यादी अनुसार तातत्कालीन सरपंच बलकुवे एकनाथ आत्माराम पाटील व मुखेड विद्यामन सरपंच केलीबाई गंगाराम पावरा, व ग्रामसेवक राकेश सुरेश सुर्यवंशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास आर्थिक गुन्हे अन्वेशन शाखेकडे देण्यात आला आहे.

संगनमताने अपहार केल्याचा आरोप
या फिर्यादीत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ग्रृप ग्रामपंचायत बलकुवा , कुवा, मुखेड यांना शौचालय बांधणार्‍या लाभार्थ्यांना वितरीत करण्यासाठी अग्रीम देण्यात आलेले अनुदान चौकशीत सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमताने बँक खात्यतून काढून अपहार केल्याचे नमुद केले आहे. वरील तीन्ही लोकांनी मिळालेल्या अनुदानातुन रक्कम रु.21,77,800चा अपहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याबाबत सीईओ यांना दिलेल्या अहवाला अनुसार त्यांनी सदर दोषींवर गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र या गुन्ह्यातील सामविष्ठ बडे अधिकारी पुढील पोलीस तपासात समोर आल्यास याची तीव्रत्रा वाढुन आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिवसभरातील घडामोडी
आज सकाळी 10.30 वा. मा.आमदार काशिराम पावरा यांनी आंदोलकर्त्यांची भेट घेतली. मात्र आमदार महोदय जनतेच्या प्रश्‍नांसाठी वेळ नाही व उशिरा दखल घेण्यास आले या वरुन तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. आमदारांनी आपली भूमिका मांडली व दोषींना शासन करुन आज निर्णय लावतो असे आश्‍वासन दिले. मात्र यावर समाधान न मानता आंदोलकांनी आमदांना थेट खडे बोल सुनावत आपला अधिकार्‍यांवर वचक नाही व अधिकारी मुजोर झाले आहेत असा आरोप केला. मात्र पंचायत समिती संचालक मंडळ निष्क्रीय असुन ते जनतेच्या हितासाठी नव्हे तर अधिकार्‍यांच्या भल्यासाठी काम करतात त्यामुळे याची दखल घेऊन कार्यवाही करण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले. दरम्यान झालेल्या शाब्दीक चकमकीत माझ्याकडे उशिरा तक्रार आल्याने दखल घेण्यास उशिर झाला असे मत आमदारांनी व्यक्त केले.