बलवाडी-खिर्डी रस्ता मोजतोय अखेरची घटीका

0

खिर्डी : बलवाडी- खिर्डी या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून रस्त्यावर जीवघेणे खड्डे वाढत असल्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. संबंधित प्रशासनाला तातडीने ही समस्या सोडवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. या रस्त्याने केळी वाहतूक करणारे ट्रक, मोटारसायकल, शाळकरी विद्यार्थ्यांची नेहमी वर्दळ सुरुच असते. या रस्त्यावर खड्डे चुकवित असताना समोरील वाहनावरील लक्ष न राहिल्यास अपघात होण्याच्या घटना वारंवार घडताना दिसून येत आहेत.

रस्ता सोसतोय घाव
बलवाडी-खिर्डी हा पाच किलोमीटर अंतराचा रस्ता असून रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्त्यावरील खडी बाहेर निघून खड्डे वाढल्याने रस्ता खिळखिळा झाला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडल्याने दिवसा तसेच रात्रीही वाहनधारकांना ये-जा करण्यास मोठी कसरत करावी लागते. सदरच्या रस्त्यावर येणार्‍या जाणार्‍या नागरीकांची दिवसभर वर्दळ सुरूच असते. खड्डे चुकवितांना अचानक वाहन आल्यास अपघात होतात. या रस्त्याच्या मजबूतीकरण व डांबरीकरणास मागील वर्षी जि.प.निधीतून मंजूरी मिळाली असूनही अपूर्ण काम करण्यात आले होते तसेच अद्यापपर्यंर्त कामास सुरूवात करण्यात आलेली नसल्याने वाहनधारकांकडून तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनीधींनी यासंदर्भात पाठपुरावा करून रस्त्याची लवकरात-लवकर दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.