रावेर : तालुक्यातील बलवाडी शिवारातील खिर्डी रस्त्यावर दत्त मंदिराजवळ पुन्हा वाघाचे दर्शन झाल्याने शेतकर्यांमध्ये घबराट पसरली आहे. रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास एका दुचाकीस्वाराने शेतात असलेल्या वाघाचे मोठ्या हिंमतीने छायाचित्र काढले. काही वेळेने वाघ पुढील शेतात गेल्यानंतर येथील शेतकरी संजय धोंडू चौधरी यांना वाघाबाबत माहिती दिली. पंढरी पाटील यांच्या शेतातून वाघ रस्ता ओलांडत गट क्रमांक 57 मधील जाकीर पिंजारी, अब्दुल पिंजारी व संजय चौधरी यांच्या शेतातून पुढील शेतात निघून गेला. तीन दिवसांपूर्वी पुरी शिवारात वाघाचे दर्शन झाले होते तर वन विभागाने या बाबीस दुजोराही दिला होता. व्याघ्र दर्शन वारंवार होत असल्याने शेतकर्यांमध्ये भीती पसरली आहे.