वादविवाद म्हटले की आधी गावच्या पारावर बसलेले काही वृद्ध मंडळी दिसायची नंतर दिसू लागलं की कुठल्याशा न्यूज चॅनेलवर काही नेते, समाजकर्ते, चित्रपटातले सेलिब्रेटी आणि एखादा-दुसरा सामान्य माणूस असं काहीसं… पण इंटरनेट आणि सोशल मीडियाने सध्याच्या काळात वादविवाद नि चर्चेला एक वेगळं वळण दिलेलं दिसतं. फेसबुक असो वा ट्विटर अगदी सामान्य माणसापासून ते मोठ्यातल्या मोठ्या सेलिब्रेटीपर्यंत एकमेकांना सहज पोहोचता येऊ लागलंय. जगात कुठेही एखादी बातमी बाहेर पडली रे पडली की नेटिझन्स ती बातमी एवढी पसरवतात की गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या प्रत्येक माणसापर्यंत ती हातोहात पोहोचते. खरंतर ही झाली वरवरची बातमी, पण खरंच जी बातमी लोकांपर्यंत पोहोचते ती खरी असते का? बर्याचदा या मीडिया साइट्सवर बातम्या चढवून दिल्या जातात. रोजच्या आयुष्यावर याचा परिणाम होतो की नाही याचा विचारच कुणी करत नाही.
महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली की एक गोष्ट लक्षात येते की सध्या जातीवरून राजकारण करणारे बोटावर मोजणारे असले तरी मूळ जातीयवाद फोफावण्याचं काम या सोशल साइट्सवर होताना दिसतंय. कोणाला कशाची आवड तर कोणाला कशाची, पण समाजाबद्दलचे ज्ञान पाजळताना काहींचा तोल सुटतो. गोष्टी देश, राज्य, जिल्हा, तालुका, शहर, परिसर इथवर येऊन न थांबता तो स्त्री-पुरुष लिंगभेद, काळा-पांढरा वर्ण असेही विषय बाजूला सोडून मग हिंदू-मुसलमान यावरही न थांबता स्वतःच्याच धर्माच्या जातींमध्ये भेद करू लागतात.
हे सगळं पाहताना-वाचताना गढूळ झालेला समाज दिसतो. शिकलेल्या, जग पाहिलेल्या तरुणांनी या गोष्टी बदलण्याचा आतातरी प्रयत्न करायला हवा पण काही बुरसट विचारांचे नि खालावलेल्या मानसिकतेचे काहीजण तरुणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून समाजाच्या चाळण्या करताना दिसून येतात. कोणी कुठे थांबायचं आणि कुठे नाही हे तरुणांच्या हातात न राहिल्यासारखे आता वाटू लागले आहे आणि दुसरीकडे असतो तो तरुण वर्ग चॅटिंग आणि सर्फिंगमध्ये गुंतलेला आहे… प्रचंड हुशार, जगाची इत्यंभूत माहिती असलेले, पण समाजाकडे दुर्लक्ष असणारे अशीही तरुणाई आहे. समाज असाच गढूळ होत राहणार आहे असं मनात पक्के घर करून ही मुलं भारत सोडून इतर सर्व गोष्टींवर व्यक्त होतात. मग सीरियामधली स्थिती असो वा लंडनच्या पॉपस्टारची कॉन्सर्ट पण भारताच्या कोणत्या भागात काय चालू आहे हेही यांना माहित नसते. ही परिस्थिती का निर्माण झाली? तिसरा तरुण वर्ग मात्र कायम वंचित राहतो कौतुकावाचून… कारण हा खरंच समाजाच्या बिघडलेल्या मानसिकतेवर उपचार करत असतो, तो खर्या अर्थाने झटत असतो एक कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून… तरुणांचे आधीचे दोन वर्ग तिसर्याला मदत करू लागले तर आपण एक सक्षम समाज निर्माण करू शकू. सक्षम तरुण, समाज, शहर, राज्य नि मग देश… पण, यासाठी गरज आहे तरुणांना वास्तवाची जाणीव करून देण्याची… इंटरनेटमुळे जितकं तुम्ही शिकताय त्याचा समाजासाठी जर उपयोग करून घेतला तर आपण खर्या अर्थाने एक उत्तम देशाचे उत्तम नागरिक बनून आपल्या देशाचे नेतृत्व करू शकतो आणि तरच मग साने गुरुजींच्या गीतातला आपला हा देश ‘बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो!’, असं म्हणू शकेल.
– भाग्यश्री गायकवाड