कोलंबो : कर्णधार मिताली राज आणि मोना मेश्रामच्या अर्धशतकी खेळीपाठोपाठ शिखा पांडे, तसेच एकता बिश्त यांच्या भेदक माऱ्याच्या बळावर भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी विश्वचषक पात्रता सुपरसिक्सच्या पहिल्या सामन्यात बुधवारी द. आफ्रिकेवर ४९ धावांनी शानदार विजय नोंदविला. मिताली राज आणि शिखा पांडे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
मोना-मितालीची ९६ धावांची भागीदारी
प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने निर्धारित षटकांमध्ये ८ बाद २०५ धावा केल्या. कर्णधार मितालीने १० चौकारांसह ८५ चेंडूंत सर्वाधिक ६४ धावा केल्या, तर सलामीवीर मोना मेश्रामने ५५ धावा काढल्या. मोना आणि मिताली यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. मारीझानी कॅप आणि अयाबोंगा खाका यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. लिझेले ली आणि लॉरा वॉलवार्ट लवकर बाद झाल्यामुळे आफ्रिकेची २ बाद ८ अशी अवस्था झाली. त्रिशा छेट्टी (५२) वगळता आफ्रिकेच्या एकाही खेळाडूला भारतीय गोलंदाजांसमोर टिकाव धरता आला नाही. रताच्या वेगवान आणि फिरकी माऱ्यापुढे नांगी टाकताच ४६.४ षटकांत १५६ धावांत संपूर्ण संघ बाद झाला. शिखा पांडेने ३४ धावांत ४ बळी मिळवले, तर एकता बिश्तने २२ धावांत ३ बळी घेत तिला छान साथ दिली.