बलात्कारांच्या घटनांमुळे जगभरातील ६०० विचारवंतांचे मोदींना खुले पत्र

0
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणी जगभरातील सुमारे ६०० हून अधिक शैक्षणिक संस्था आणि विचारवंतांनी खुले पत्र लिहून नाराजी दर्शवली आहे. देशात एवढी गंभीर परिस्थिती असताना मोदींनी मौन बाळगले आहे, असा आरोप या पत्रातून करण्यात आला आहे. देशातल्या या घटनांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील याचे नकारात्मक पडसाद उमटत आहेत.
पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कठुआ-उन्नाव आणि त्यानंतरच्या घटनांबाबत आम्ही क्लेश आणि दु:ख व्यक्त करीत आहोत. आपल्या पक्षाच्या प्रवक्त्याने या घटनांवरून वेग‌वेगळ्या पद्धतीने मांडणी करण्याचा प्रयत्न केला. या घटनांनंतर त्या राज्यांतील प्रशासनाने हे राक्षसी कृत्य करणाऱ्या आरोपींना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला. देशातील या भयानक स्थितीवर तुम्ही दीर्घकाळ मौन पाळून असल्याचे आणि या घटनांशी आपल्या पक्षाचे असलेले संबंध, जे नाकारता येणार नाहीत, आम्ही पाहात आहोत, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, कालच केंद्रीय मंत्रिमंडळाने12 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींवर बलात्कार प्रकरणी दोषी आढळल्यास मृत्युदंडासह अनेक कठोर शिक्षांची तरतूद असलेल्या अध्यादेशास मंजुरी दिली आहे.