बलात्काराचा आरोप असलेल्या गायत्री प्रजापती यांना अटक

0

नवी दिल्ली । अखिलेश सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलेल्या आणि बलात्काराचा आरोप असलेल्या गायत्री प्रजापती यांना अखेर बुधवारी अटक करण्यात आली. बिहार पोलिसांनी लखनऊमधून प्रजापती यांना अटक केली. न्यायालयासमोर प्रजापती यांना हजर करण्यात आले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, प्रजापती यांनी संबंधीत महिलेची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे.

काही दिवसांपूर्वी एका महिलेने आपल्यावर सामूहिक बलात्कार झाला असून त्यात प्रजापती यांचाही समावेश असल्याचा आरोप केला होता. प्रजापती यांच्याविरोधात प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यासाठी या महिलेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पीडित महिलेच्या सांगण्यानुसार तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला असून तिच्या मुलीचेही शोषण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रजापती यांनी धमकावत गेल्या दोन वर्षात आपल्यावर अनेकवेळा बलात्कार केल्याचा आरोपही या महिलेने केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रजापती यांच्याविरोधात बलात्कार आणि पॉक्सो कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश देत उत्तर प्रदेश पोलिसांना आठ दिवसांच्या आत त्यासंदर्भात अहवाल देण्यास सांगितले होते.

नार्को टेस्टची मागणी
या प्रकरणात खरं काय आहे ते लोकांसमोर यायला पाहिजे, असे सांगत गायत्री प्रजापती यांनी त्या महिलेची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. प्रजापती काही दिवसांपासून फरार झाले होते. त्यामुळे न्यायालयाने प्रजापती यांच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट काढून त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले होते.
प्रजापती यांच्या अशोक तिवारी, पिंटू सिंग, विकास शर्मा, चंद्रपाल, रुपेश आणि आशिष शुक्ला या सहकार्‍यांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. त्यानंतर मंगळवारी पोलिसांनी प्रजापती यांचा मुलगा अनुराग आणि भाचा सुरेंद्र याला ताब्यात घेतले होते.