रामपूर : उत्तर प्रदेशातील रामपूरच्या गंज पोलीस ठाण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. बलात्काराची तक्रार नोंदवण्यासाठी आलेल्या एका पीडितेकडे एका पोलीस अधिकार्यानेच शरीर संबंधांची मागणी केली. मात्र या घटनेस आता चार महिने उलटून गेल्यानंतरही संंबंधित पोलिस अधिकारी मोकाटच असल्याने याबाबत संताप व्यक्त होत आहे. उपनिरीक्षक जय प्रकाश सिंग असे या अधिकार्याचे नाव असून पीडित महिलेने केलेल्या आरोपांमुळे एकच खळबळ माजली आहे.
नकार दिला म्हणून तपास थांबवला
संबंधित महिला आपल्यावर बलात्कार झाल्याची तक्रार देण्यासाठी गंज पोलीस ठाण्यात गेली होती. मात्र बलात्काराची तक्रार नोंदवून आरोपींना अटक करायची असेल, तर शरीर संबंध ठेवावे लागतील, अशी धक्कादायक मागणी जय प्रकाश सिंग यांनी केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. शरीर संबंधांस नकार दिल्याने सिंग यांनी प्रकरणाचा तपास थांबवल्याचाही आरोपदेखील महिलेने केला आहे.
… आधी माझी मागणी पूर्ण कर!
‘जेव्हा मी पोलीस उपनिरीक्षक जय प्रकाश सिंग यांच्याकडे तक्रार नोंदवण्यासाठी आणि आरोपींना पकडण्याची मागणी करण्यासाठी गेले, तेव्हा त्यांनी माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यांनी अनेकदा माझ्या मोबाईलवर फोन करत मला खोलीवर बोलावले. मात्र मी त्यांना नकार दिल्यावर, त्यांनी प्रकरणाचा तपास बंद केला,’ असे पीडित महिलेने म्हटले. ‘त्यांनी मला वारंवार बलात्कारावेळी काय काय घडले, हे विचारले. त्यांनी अनेक आक्षेपार्ह प्रश्नदेखील विचारले. तू आधी माझी मागणी पूर्ण कर, मग आरोपी पकडले जातील, असे सिंग यांनी म्हटले,’ अशी व्यथा पीडितेने सांगितली.
महिलेवर दोघांचा बलात्कार
पीडित महिला (वय – 37)रामपूरची रहिवासी असून 12 फेब्रुवारीला तिच्यावर दोघांनी बलात्कार केला. बंदुकीचा धाक दाखवून दोघांनी महिलेवर अत्याचार केले. यातील एकजण महिलेला ओळखत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाची तक्रार नोंदवण्यास पोलिसांनी नकार दिला होता. मात्र पीडितेने स्थानिक न्यायालयात धाव घेतल्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली. दरम्यान, रामपूरचे पोलीस अधीक्षक विपिन ताडा यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.