बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीचे डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातून पलायन

नशिराबाद पोलीस ठाणे हद्दीतील घटना : आरोपीच्या शोधार्थ पथके रवाना

भुसावळ : बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीने डॉ.उल्हास पाटील हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असताना कैदी वॉर्डातील खिडकीची जाळी तोडून पलायन केल्याची खळबळजनक घटना शनिवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली. शंकर रवींद्र चौधरी उर्फ रहिम नज्जू पठाण (30, शिव कॉलणी, धर्मराव कुंडीचाळ, मालेगाव नाका, चाळीसगाव) असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे.

एक वर्षापूर्वीच झाली होती अटक
आरोपी शंकर रवींद्र चौधरी (30, चाळीसगाव) याच्या विरोधात चाळीसगाव पोलीस स्टेशन गुरनं. 288/20 भादंवि कलम 376 अन्वये अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. एक वर्षापासून आरोपी न्यायालयीन कोठडीत असून 22 जून रोजी त्याच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यास डॉ.उल्हास पाटील हॉस्पीटलमध्ये पोलीस गार्ड बंदोबस्तात उपचार सुरू करण्यात आले होते मात्र शनिवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास आरोपीने उपचार सुरू असलेल्या कक्षातील खिडकीची जाळी अलगद तोडून पलायन केले. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, नशिराबादचे सहा.निरीक्षक गणेश चव्हाण यांनी रुग्णालयात जावून घडल्या प्रकाराची माहिती घेतली. या प्रकरणी पोलीस मुख्यालयातील हवालदार सुरेश श्रीराम सपकाळे यांच्या फिर्यादीनुसार नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना
पसार आरोपी शंकर रवींद्र चौधरी यांच्या शोधार्थ चाळीसगावसह सोयगाव परीसरात पथक रवाना करण्यात आल्याचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले.