बलात्कार्‍याचा भरचौकात निर्घृण खून

0

बारामती : बलात्काराच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या अल्पवयीन मुलाची पीडित मुलीच्या पित्याने भरचौकात कोयत्याचे वार करून निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना नीरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) येथे काल दुपारी घडली. आरोपीने स्वत:च पोलिसांना फोन करून आपण हत्या केल्याचे सांगितले. या प्रकरणातील मृत संशयीत अल्पवयीन असल्याने व आरोपी पीडित मुलीचा पिता असल्यामुळे मुलीची ओळख पटू नये म्हणून त्याची नावे प्रसिद्ध केलेली नाहीत.

काय आहे प्रकरण?
नातलग असलेली पीडित मुलगी व अल्पवयीन मुलगा गावात शेजारी राहत होते. 10 एप्रिलरोजी हा मुलगा व त्याच्या चुलत भावाने शेजारी राहणार्‍या मुलीवर बलात्कार केल्याची तक्रार मुलीच्या कुटुंबीयांनी दाखल केली होती. त्यावरून दोघांवर इंदापूर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात आरोपी मुलगा अल्पवयीन असल्यामुळे पुण्यातील बालन्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. दरम्यान, न्यायालयाने सोडले असले तरी मी त्याला सोडणार नाही, अशी धमकी पीडित मुलीचा पिता आरोपी मुलाच्या कुटुंबीयांना देत होता. या भीतीपोटी कुटुंबीयांनी त्या मुलास इंदापूरच्या वसतिगृहात ठेवले होते.

पीडितेनेही केले वार
परीक्षा संपल्यामुळे अल्पवयीन मुलगा गुरुवारी दुपारी तीन वाजता आई- वडिलांकडे गावी आला होता. तो आल्याचे शेजारीच राहणार्‍या मुलीच्या कुटुंबीयांना कळाले. हा मुलगा घरात जाताच पीडित मुलगी व तिचे वडील धारदार कोयते घेऊन त्यांच्या घरात घुसले. आरोपीची शोधाशोध सुरू केली. त्यांचा रुद्रावतार पाहून मुलाच्या आई-वडिलांनी दोघांनाही रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडित मुलीने त्याच्या आईच्या छातीवर वार केला तर बापाने मुलाच्या वडिलांच्या हातावर वार केला. दोघेही जखमी आहेत.

पाठलाग करून गाठलेच!
पीडित मुलगी व तिच्या पित्याचा रुद्रावतार पाहून अल्पवयीन मुलगा जीव वाचवून जिवाच्या आकांताने घराबाहेर पळाला. मात्र मुलगी व तिच्या बापाने त्याचा पाठलाग सुरूच ठेवला. शिवाजी चौकात त्याला गाठले व खाली पाडून त्याच्या गळ्यावर वार केले. यात अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपीनेच पोलिसांना फोन करून माहिती दिली. पोलिसांनी आरोपीस घटनास्थळावरून अटक केली आहे. पोलिसांनी पीडितेवरही खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.