अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील लोणी-मावळा (ता. पारनेर) येथील शाळकरी मुलीवर सामुहिक बलात्कार करून खून केल्याप्रकरणी तिन्ही आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली. या खटल्याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले होते. लोणी-मावळा, ता. पारनेर येथील शाळकरी मुलीवर अत्याचार करुन तिचा खून केल्याची घटना 22 ऑगस्ट 2014 रोजी घडली होती.
32 साक्षीदार तपासले
या प्रकरणी संतोष विष्णू लोणकर (34), मंगेश दत्तात्रय लोणकर (30) व दत्तात्रय शंकर शिंदे (27) हे आरोपी निष्पन्न झाले होते. सर्व आरोपींना अटक झाल्यानंतर पोलिसांनी 18 नोव्हेंबर 2014 रोजी जिल्हा न्यायालयात आरोपींविरोधात दोषारोप पत्र दाखल केले. या घटनेनंतर पारनेर तालुक्यासह जिल्ह्यात संतापाची लाट निर्माण झाली होती. या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी नियुक्ती करावी, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारकडे केली होती. अॅड. उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर लोणी-मावळा खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने एकूण 32 साक्षीदार तपासण्यात आले. या घटनेत प्रत्यक्ष साक्षीदार नव्हता. मात्र सरकारी पक्षाने न्यायालयात 24 परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी सादर केली.
अखेर न्याय मिळाल्याची भावना
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन खून केल्याप्रकरणी तिघा आरोपींवर दोषारोप पत्रात कट, पाठलाग करुन अत्याचार, खून व बाललैंगिक अत्याचार असे सहा आरोप ठेवण्यात आले होते. यानुसार जिल्हा व सत्र न्यायाधिशांनी 6 नोव्हेंबर रोजीच तिन्ही आरोपींना दोषी ठरविले होते. त्यानुसार शुक्रवारी (दि. 10) न्यायाधीश केवले यांनी संतोष लोणकर, मंगेश लोणकर व दत्तात्रय शिंदे यांना फाशीची शिक्षा सुनावली. या प्रकरणाचा निकाल ऐकण्यासाठी लोणीमावळा ग्रामस्थांसह जिल्हाभरातून न्यायालयाच्या आवारात मोठी गर्दी जमा झाली होती. निकालानंतर अखेर न्याय मिळाला अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
काय होती घटना?
लोणी-मावळा येथे अळफुटीवरुन येणार्या शाळकरी मुलीवर अत्याचार करुन खूनाची घटना घडली. यापूर्वी संतोष लोणकर याने मुलीची छेड काढून तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. संतोष लोणकरसह मंगेश लोणकर व दत्तात्रय शिंदे यांनी तिचा पाठलाग करुन अत्याचार केला. पिडीत मुलीच्या नाकातोंडात चिखल घालून संतोष लोणकर याने मुलीच्या डोक्यावर स्क्रुड्रायव्हरने वार केले. तर मंगेश लोणकर याने मुलीच्या डोक्यात दगड घातला. दत्तात्रय शिंदे याने मुलीचे पाय पकडून ठेवले होते. मुलीच्या मृत्यूनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या अंगावर चिखल टाकला होता. आरोपींच्या या विकृत कृतीने लोणीमावळासह जिल्हा हादरुन गेला होता. त्यामुळे आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी अॅड. उज्ज्वल निकम यांनी केली होती.
घटनाक्रम
22 ऑगस्ट 2014 – पिडीत मुलीचा पाठलाग करुन अत्याचार व खून
23 ऑगस्ट 2014 – आरोपी संतोष लोणकर याला अटक
24 ऑगस्ट 2014 – आरोपी मंगेश लोणकर व दत्तात्रय शिंदे यांना अटक
18 नोव्हेंबर 2014 – जिल्हा न्यायालयात दोषारोपत्र दाखल.
डिसेंबर 2014 – अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती
1 जुलै 2015 रोजी खटल्याच्या सुनावणीला सुरुवात
7 जुलै 2017 खटल्याची सुनावणी पुर्ण
6 नोव्हेंबर 2017 आरोपींवरील दोष सिद्ध
10 नोव्हेंबर 2017 तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा.