अमळनेर। चोपडा तालुक्यातील बोरमळी येथील सख्या साडूच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी आरोपीस 10 वर्ष तुरुंगवास 7 हजार रुपये दंडाची शिक्षा येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या.राजीव पी.पांडे यांनी मंगळवारी 4 रोजी सुनावली आहे. चोपडा तालुक्यातील बोरमळी येथील रहिवासी कालुसिंग रेंदा पावरा यांनी अडावद पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 20 ऑक्टोबर 2015 रोजी झालेल्या गुन्ह्यात ही शिक्षा सुनावली आहे. 19 ऑक्टोबर 2015 रोजी आरोपी पाता सोमा पावरा यांनी साडू कालुसिंग ह्यांच्या 14 वर्षीय मुलीला खावु देण्याचे आमिष दाखवुन घरी नेऊन वाईट कृत्य केले. त्यानंतर पिडीत मुलगी रडत रडत मामाच्या घरी गेली. ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद किसन पाडवी यांना संबंधीत घटना व घटनास्थळ दाखविण्यात आले.
2015 मध्ये अटक
त्यानंतर अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी सोमा पावरास 23 ऑक्टोबर 2015 रोजी पोलिसांनी अटक केली व त्यादिवसापासून तो तुरुंगात होता. हा खटला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरू होता यात सरकारी वकील अॅड.किशोर बागुल मंगरुळकर यांनी 9 साक्षीदार तपासले यात न्यायालयाने पिडीत, पिडीतेचे वडील, आई यांच्यासह तपास अधिकारी पोलीस उपरिक्षक पंकज शिंदे यांची साक्ष ग्राह्य धरण्यात आले.
शिक्षा व दंड एकत्र
जिल्हा व अतिरिक्त न्या.राजीव पी.पांडे यांनी सदर आरोपी पाता सोमा पावरा यास भादवी कलम 376/ 2 एफ नुसार 10 वर्ष शिक्षा 5 हजार रुपये दंड व कलम 506 प्रमाणे 2 वर्ष शिक्षा व 2 हजार रु दंड अशा दोन शिक्षा सूनवल्या असून दोन्ही एकत्र भोगायची आहे असा निकाल दिला आहे. सदर आरोपी हा अटक झाल्यापासून तुरुंगात आहे यात पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार अशोक पाटील यांनी काम पाहिले आहे.