नवलाख उंब्रेत भंगार वेचणार्या मुलीवर केला होता प्रकार
तळेगाव दाभाडे : नवलाख उंब्रे (ता. मावळ) येथे सात वर्षांपूर्वी भंगार वेचणार्या मुलीला डांबून ठेऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एकास बुधवारी शिवाजीनगर न्यायालयाने दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. तसेच पिडीत मुलीला दहा हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. अयुब कासिम पटेल (वय 44, रा. तळेगाव दाभाडे, रेल्वेस्टेशन) असे आरोपीचे नाव आहे. जिल्हा न्यायाधिश एम.एम.देशपांडे यांनी शिक्षा सुनावली आहे.
सात वर्षांपूर्वीची घटना
नवलाख उंब्रे येथे 2012 मध्ये तीन मुली भंगार वेचण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी सेंट्रिगची कामे करणार्या अयुब पटेल याने या मुली सेंट्रिगच्या प्लेट चोरत असल्याच्या संशयावरुन त्यांना वराळे येथील एका इमारतीत डांबून ठेवले होते. त्यानंतर दुसर्या दिवशी डांबून ठेवलेल्या इमारतीमध्ये जावून त्याने एका मुलीवर बलात्कार केला होता. त्यानंतर मुलीने मानलेल्या भावाला हा सगळा प्रकार सांगून तळेगावदाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तळेगाव पोलिसांनी आरोपी अयुब पटेल याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 376, 342, 323, 384, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला गजाआड केले होते.