इंदापूर | देशासह महाराष्ट्रात बलात्काराच्या अनेक घटना वारंवार घडत आहेत. त्यानंतर त्या बलात्काऱ्यांना कायद्याच्या चौकटीत शिक्षा होण्यासाठी मोठा कालावधी जातो. त्यामुळे बलात्कारांचे प्रमाण वाढताना दिसते. मात्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात असलेल्या नीरा-नृसिंहपूर या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राच्या गावात एक अशी घटना घडली आहे, ज्यामुळे पूर्ण देशातील बलात्कारांना अटकाव बसू शकेल. “एका मुलीवरील बलात्कारानंतर आरोपीला न्यायालयाने जामिनावर सोडले होते. मात्र त्या मुलीने स्वत:वरील बलात्काराचा बदला घेत त्या बलात्काऱ्यांला यमसदनी पाठवले.”
या घटनेमुळे इंदापूर तालुका हादरला असला, तरी त्या मुलीच्या धाडसाचे कौतुक होत असून, समस्त स्त्री जातीवरील अत्याचार, बलात्कार थांबवण्यासाठी अशा रणरागिणींची गरज असल्याचे मत स्त्री वर्गासह पुरुष मंडळी देखील व्यक्त करत आहेत. त्याचवेळी मुलीने केलेले कृत्य चुकीचे असून, तिने कायद्यावर विश्वास ठेवायला हवा होता. कायदा हातात घ्यायला नको होता. न्यायालयाने बलात्काऱ्यांला उचित शिक्षा दिलीच असती, असेही मत व्यक्त केले जाते आहे. त्यामुळे या घटनेच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत असल्याचे दिसते.
नीलेश नागनाथ घळके (वय १७, रा. नीरा-नृसिंहपूर, ता. इंदापूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. मयत तरुण आणि आरोपी हे एकमेकांचे नातलग असून शेजारी शेजारी रहातात. पीडित मुलीने दि. १० एप्रिल २०१७ रोजी नीलेश नागनाथ घळके व श्रीकांत पोपट घळके (रा. गणेशगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) या दोघांविरुद्ध इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये बलात्कार केल्याची तक्रार दिली होती. यावरून गुन्हा दाखल झाला होता.
त्यानंतर या प्रकरणात श्रीकांत घळके याला अटक करण्यात आली होती. तर मयत नीलेश अल्पवयीन असल्याने त्याला त्या वेळी पुण्यातील बालन्यायालयात हजर करण्यात आले होते. तेथेच त्याचा जामीन झाला होता. यामुळे पिडीतेचे वडील आणि पीडिता त्याच्यावर चिडून होते. त्यांच्या घरी जाऊन ते सतत “न्यायालयाने त्याला सोडले असले, तरी आम्ही सोडणार नाही”, अशी धमकी देत होते. त्यानंतर घाबरलेल्या घळके कुटुंबीयांनी मयत नीलेश याला इंदापूर येथेच शिक्षणासाठी ठेवले होते.
दरम्यान नीलेशची परीक्षा संपल्याने तो गुरुवारी दुपारी ३ वाजता घरी आला. हातपाय धुण्यासाठी तो आतल्या खोलीत गेलाच होता. एवढ्यात हातात कोयते घेऊन बलात्कार पिडीत मुलगी आणि तिचे वडील निलेश याच्या घरात घुसले. त्यांनी घरात निलेशचा शोध सुरु केला. यावेळी नीलेशच्या आई वडीलांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या पिडीतेच्या वडिलांनी नागनाथ घळके यांच्या हातावर व कपाळाच्या डाव्या बाजूला कोयत्याने वार केले. तर पीडित मुलीने मयत निलेशची आई सुनीता घळके यांच्या छातीवर वार केला.
आपल्या कुटुंबीयांवर हल्ला झाल्याचे लक्षात येताच मयत नीलेश हा घरालगत असणाऱ्या दुकानाच्या शटरमधून मागच्या बाजूने पळून गावाच्या मुख्य रस्त्याने चौकाकडे धावला. मात्र हे लक्षात येताच त्या बाप-लेकीने त्याचा पाठलाग करत, त्याला चौकात गाठले. यावेळी पिडीत मुलीच्या वडिलांनी नीलेशच्या डाव्या व उजव्या हातावर, गालावर व गळ्यावर सपासप वार करत त्याला जखमी केले. यावेळी झालेले कोयत्याचे घाव एवढे घातक होते, की त्याच्या डाव्या हाताचा पंजा हातावेगळा होऊन बाजूला पडला होता. यानंतर मुलीचा बाप घटना स्थळावरून निघून गेला. मात्र पीडित मुलगी निलेश पूर्णपणे मयत झालाय का हे पाहण्यासाठी तिथेच थांबली होती.
दरम्यान निलेशचे आई, वडील त्याच्या पाठोपाठ घटनास्थळावर पोचले. यावेळी त्या पिडीतेने “यावेळी तू वाचली आहेस, पण तुझ्या घरादाराला सोडणार नाही” अशी धमकी देऊन ती तेथून निघून गेली. त्यामुळे मयत निलेश याचे कुटुंबीय धास्तावलेले आहेत. तर भरदिवसा आणि भर वर्दळीच्या मुख्य चौकात घडलेल्या या प्रकाराने नीरा-नृसिंहपूर गावात खळबळ उडाली. बघता बघता हे वृत्त इंदापुरात धडकले. तेथे देखील एकच चर्चांना उधान आले.
याबाबत मृत नीलेशची आई सुनीता नागनाथ घळके (रा. नीरा-नृसिंहपूर) यांनी इंदापूर पोलीस तक्रार दिली आहे. घटनेनंतर पिडीत मुलगी आणि तिचे वडील फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
घटनेनंतर इंदापूर तालुक्यात चर्चांना उधाण आले असून, पिडीतेने केलेल्या कृत्याचे काहीजण समर्थन करत आहेत. कायद्याने जर बलात्काऱ्यांना वेळीच कडक शिक्षा केली असती, तर असे प्रकार थांबले असते, कोपर्डी असेल की दिल्ली मधील निर्भया प्रकरण असेल, किंवा महाराष्ट्रासह देशभरात दररोज होणाऱ्या बलात्काराच्या घटना असतील, त्यांना अटकाव घालण्यासाठी बलात्काऱ्यांना कठोर शासन होणे गरजेचे आहे. तर अनेकजण ‘बलात्काऱ्यांना एकच शिक्षा “छत्रपती शासनाचा चौरंगा” करायला हवा’ असे मत व्यक्त होताना दिसते. तर या घटनेतील पिडीत मुलीला निर्दोष सोडले, तरी राज्यभरात नव्हे तर देशातील बलात्काऱ्यांना धसका बसेल, बलात्कार आणि महिलांवरील अत्याचार पूर्णपणे थांबतील असे परखड मत व्यक्त केले जाते आहे.
मात्र खुनाच्या कृत्याचे कधीही समर्थन होऊ शकत नाही. देशात सक्षम कायदे आहेत. आरोपींना शिक्षा देण्यासाठी न्यायालय आहेत. मुलीने कायदा हातात घ्यायला नको होता, असेही मत व्यक्त केले जाते आहे. एकूणच चित्रपटात दाखवल्या जातात तशा पद्धतीने घडलेल्या या घटनेबद्दल संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, या घटनेनंतर आणखीन “बदले की आग” भडकू नये, आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन कायद्याच्या चौकटीत शिक्षा द्यावी, असेही मत व्यक्त केले जात आहे.